मुंबई – सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी 8 हजार 848 मीटर उंची असलेले जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. गुरव हे मूळ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडी गावचे आहेत.
महाराष्ट्र पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिलेच मराठी अधिकारी असून, अशी कामगिरी करणारे राज्याचे सुहेल शर्मा व रफीक शेख यांच्यानंतरचे तिसरे पोलीस अधिकारी आहेत.
गुरव यांनी 2019 साली एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. ऑक्सिजन सिलिंडर वगैरे सर्व साहित्य असूनही तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना ही मोहीम सोडून माघारी परतावे लागले. त्यानंतर यंदा मात्र त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करत यश मिळवले.
गुरव यांनी 23 मे रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. गुरव गेल्या 15 वर्षांपासून पोलीस खात्यात सेवेत आहेत. ते सध्या पनवेलमध्ये कार्यरत आहेत.