स्ट्रेसा (इटली) – इटलीच्या उत्तर भागामध्ये दोन डोंगरांना जोडणारी केबल कार कोसळून झालेल्या अपघातामध्ये 14 जण ठार झाले. मोट्टारोन पर्वताच्या शिखरावरून दुसऱ्या डोंगरमाथ्यावर जाणाऱ्या केबल कार दुर्घटनाग्रस्त झाली. या ठिकाणच्या लेक मॅगिओर आणि स्वीत्झर्लंडजवळच्या अन्य तलावांचे दर्शन या केबल कारमधून घेण्यासाठी पर्यटक येत असतात.
या अपघातामुळे इटलीच्या परिवहन क्षेत्रातील पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबद्दल नव्याने प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. परिवहन मंत्र्यांनी या अपघाताच्या कारणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात दोषी आढणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही परिवहन मंत्र्यांनी म्हटले आहे.
केबल कारचे ब्रेक न लागल्यामुळे कार थांबली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात केबल कारमधील 5 वर्षांचा इस्रायली मुलगा जखमी झाला आहे. या केबल कारमधील तो एकमेव जिवंत राहिलेला आहे. हा मुलगा इटलीतील रहिवासी आहे.
इस्रायली दूतावासाने या मुलाच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली आहे. मरण पावलेल्यांमध्ये या मुलाचे पालक, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबाही होते, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.