खडकवासला – काकडी विकली, लिंबू पाणी विकलं आणि हे विकता विकता सह्याद्रीशी घट्ट नातं जोडलं ते कायमचं अनेक अवघड कडे सर केले आणि स्वप्न पडू लागली ती जगातील सर्वोच्च शिखराची. बघता बघता एक दिवस याच पोरानं जगातील सर्वोच्च असे एव्हरेस्ट शिखर सर केल आहे.
लहू कोंडीबा उघडे असे या तरुणाचे नाव आहे. सिंहगड वरती एकदा जायचं म्हटलं तरी दमछाक होते. लहानपणापासूनच किती तरी वेळा वर-खाली गेला असेल.. अगणित वेळा असे कित्येक किल्ले लहू कोंडीबा उघडे यांनी सर केले आहेत. ‘प्रभात’शी बोलताना उघडे म्हणाले, ही स्वप्न पडणं आणि स्वप्न पाहणं म्हणजेच जिकिरीचे काम होतं, ते आव्हान मी स्वीकारलं. सराव सुरू केला आणि या स्वप्नांचा पाटलाग करत करत हे स्वप्न सत्यात उतरवत जगातील सर्वोच्च शिखराला माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली.
त्याच्या माथ्यावरती जाऊन तिरंगा ध्वज फडकवला, भगवा फडकवला आणि आपल्या साऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या सिंहगड परिसरातील प्रत्येकाच्या मनाला लागलेली हुरहुर, काळजीच असलेलं कुटुंब, आणि त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा सर्वच मित्रपरिवार या बातमीने सुखावला. सारेच सिंहगडकर व मित्रपरिवार अत्यंत आनंदामध्ये लहूची आतुरतेने वाट पाहत आहेत.