सातारा – सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानात भूमी थिमॅटिक या संकल्पनेत उच्च कामगिरी केल्याचे गिफ्ट सातारा पालिकेने त्यांना दिले आहे. कामगारांच्या मूळ वेतनाच्या तीन टक्के वेतन वाढ देण्याच्या निर्णयाला पालिकेच्या प्रशासकीय सभेत हिरवा कंदील देण्यात आला. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय सभेत 238 विषयांना मंजुरी देण्यात आली. सातारा पालिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये माझी वसुंधरा अभियानामध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली.
सातारा नगरपरिषदेस माझी वसुंधरा बॅंक नंतर गत एक ते तीन लाख लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांक व भूमी थिमॅटिक या उच्चतम कामगिरीसाठी प्रथम क्रमांकाचे राज्य पातळीवरचे पारितोषिक मिळाले. आरोग्य विभागातील सुमारे 380 कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या वेतन वाढीचे गिफ्ट देण्यात आले आहे. यामध्ये मुकादम व सफाई कामगारांचा समावेश असून त्यांच्या मूळ वेतनाच्या तीन टक्के वेतनवाढ एक वर्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
येथील पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभा झाली. एकूण 238 विषयांवर चर्चा करण्यात आली. सभासचिव अतुल डिसले यांनी विषयांचे वाचन केले. काही महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी निर्णय घेण्यात आले. सातारा शहरातील कायम रहिवासी असलेल्या दिव्यांग व तृतीयपंथी मिळकतधारकांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.
अर्कशाळानगर, अंजली कॉलनी, सुयोग कॉलनी येथील प्लॉटधारकांच्या मालमत्ता करानुसार ज्या नागरिकांनी घरपट्टी भरली आहे, त्यांची तडजोडीची रक्कम भरून घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.सातारा शहरातील रस्त्यांवर पावसाने प्रचंड खड्डे झाले आहेत. या रस्त्यांना डांबरी पॅचिंग करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. कास धरण येथे मेन इनलेट वॉलसाठी बॅरिकेटिंग करण्याच्या कामाला मान्यता देण्यात आली. सातारा शहरातील उद्यानातील पुतळ्यांना रंग देणे व रंगकाम करणे, सातारा- कास- बामणोली- घाटाई देवी मार्गे पर्यायी रस्त्याचे विकसन करणे, नगरपरिषद हद्दीतील अजिंक्यतारा परिसर, मंगळाई परिसर, चार भिंती, स्मृती उद्यान येथे देखभाल आणि संरक्षण कामी पाच कर्मचारी पुरवणे इत्यादी काही महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.