पुणे – मनपा सेवानिवृत्त सेवकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन, निवृत्तीवेतनाच्या थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत महापालिकेच्या सेवानिवृत सेवकांनी ऑगस्ट 2023 मध्ये मागणी केलेली आहे. तरीही प्रशासनाने निर्णय घेतलेला नसल्याने मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शहराध्यक्ष मानकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, “मनपा अधिकारी, कर्मचारी, सेवक, निवृत्त सेवक आणि इतरांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबत महापालिकेने 2021 मध्ये मान्यता दिलेली आहे. याप्रमाणे दोन वर्षांत दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 31 डिसेंबर 2020 अखेरचा फरक पुणे महानगरपालिकेने आर्थिक स्थितीनुसार घ्यावा, असे नमूद केलेले आहे.
सेवकांना सातव्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा देण्यात आला असून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने ठरविल्याप्रमाणे पाच हप्त्यामध्ये थकबाकी देण्याचे ठरले असून त्यापैकी दोन हप्ते त्यांना यापूर्वी देण्यात आलेले आहेत. या ठरावांमध्ये निवृत्त सेवकांना दोन हप्त्यात थकबाकी द्यावी, असे वस्तूतः ठरले आहे. पण, थकबाकीचा एकच हप्ता देण्यात आला आहे. दुसरा किंवा अंतिम हप्ता देण्यात आलेला नाही.