राहाता – साईबाबाच्या शिर्डीत एरव्ही 70 ते 80 हजार भाविक दररोज दर्शनासाठी येतात. परंतु करोनामुळे साईबाबा संस्थानने केलेल्या आवाहनामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी रोडावली असून सध्या दिवसभरात कमी भक्त दर्शनासाठी आल्याचे दिसून आले आहे. मंदिरात दर्शन रांगा ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तपासणी केली जात आहे. पण हे तपासणी करणारे संस्थानचे कर्मचारी आहे. ते मास्कविना तपासणी करीत असल्याचे संस्थानच्या प्रशासनाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. शिर्डी तिर्थक्षेत्राचा जवळच असलेले नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डीत शाळा महाविद्यालय, सर्व धार्मिक, राजकीय, शासकीय कार्यक्रम रद्द केले असून गर्दीचे सर्व ठिकाणी नो एंट्री केली आहे.
सोमवारी साई मंदिरात तुरळक भक्त होते तर मंदिर आणि मंदिर परिसरात शुकशुकाट होता. बाजारपेठा ओस पडल्या असून दररोज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या शिर्डी शहरात करोनामुळे व्यवहार ठप्प झाले आहे. ऐन मार्च महिन्यात आर्थिक संकटाची सुद्धा भर पडली आहे. आता गुरुवारी निघणारी पालखी, रामनवमी उत्सव यावर स्थगिती येण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. मंदिरात होणारे दैनंदिन विधी पूजा, आरती हे भक्तांविना पार पडणार की काय अशीच चिंता कालच्या दृश्यावरून वाटत आहे.