नवी दिल्ली – “विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले. विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली, हे राजा यांनी सभागृहात सांगितले.
परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये, असे बजावले. यानंतर सभागृहात गोंधळ झाला होता. तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता. यानंतर अखेर आज (शुक्रवारी) साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत लोकसभेत माफी मागितली.
मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असे म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तसेच आपल्यावर न्यायालयात कोणताही गुन्हा अद्याप सिद्ध झाला नाही. तरी मला दहशतवादी म्हटले जाते. हा एका स्त्रीचा अपमान आहे आणि हा एकप्रकारचा अपराध चआहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलेच महागात पडले आहे. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपाने कारवाई केली होती. वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.