चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत ः विमानसेवाही ठप्प
कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हिमवृष्टी, वेगवान वारे आणि पावसासोबत दाखल झालेल्या चक्रीवादळामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. रस्त्यांवर कित्येक इंच जाडीचा बर्फाचा थर जमा झाला असून वेगवान वाऱ्यांमुळे विमानसेवाही बंद ठेवावी लागली आहे.
थॅंक्सगिव्हिंग हॉलिडेच्या पार्श्वभूमीवर या चक्रीवादळामुळे नागरिकांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांना फटका बसला आहे. सुमारे 55 दशलक्ष अमेरिकन नागरिकांनी या सुटीनिमित्त बाहेरगावी जाण्याची योजना आखली होती. या वादळामुळे वाहनचालक 17 तासांपर्यंत रस्त्यातच अडकून पडले आहेत. या वादळामुळे 30 इंच जाडीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. दक्षिण मिन्नेसोटामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत आहे. वादळी हवामान पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हे वादळ चालू आठवड्याच्या अखेरीस पूर्व किनाऱ्याच्या दिशेने सरकणार असल्याने सर्व महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. डेनव्हर येथील उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले आहे.
दरम्यान, गुगलने अमेरिकेत सुटीच्या या काळात पर्यटनासाठी हवामान कुठे योग्य आहे याची माहिती पुरविण्यास प्रारंभ केला आहे. कुठले स्थान आरामदायी तसेच सुरक्षित आहे याची माहिती उपलब्ध केली जात आहे.