पाटणा: इंडिया अलायन्सची चौथी बैठक आज मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्लीत होत आहे. विरोधी पक्षांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीची स्थिती आणि दिशा दोन्ही ठरणार आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपासह संयुक्त निवडणूक कॅम्पेनची घोषणा होऊ शकते. तसंच सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी कॉमन अजेंड्यावर चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो.
मात्र या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा रंगली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारीच दिल्लीत पोहोचले आहेत. आता बैठकीपूर्वी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे. नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्यासाठी राज्य कार्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे की, ‘जर आपल्याला खरोखरच विजय हवा असेल, तर एक नितीश, एक निश्चय हवा.’ (“अगर सच में जीत चाहिए, तो फिर, एक निश्चय, एक नीतीश चाहिए”) या पोस्टरवर मुख्यमंत्री नितीश कुमार एका सभेत भाषण करतानाचा फोटो लावण्यात आला आहे.
#WATCH | Patna: Posters featuring Bihar CM Nitish Kumar that read ‘Agar sach mein jeet chahiye toh fir ek Nischay aur ek Nitish chahiye’, were put up ahead of the INDIA bloc meeting, in Delhi. pic.twitter.com/mirs1VGQBd
— ANI (@ANI) December 19, 2023
या पोस्टरच्या माध्यातून नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा चेहरा घोषित करण्याची मागणी होऊ लागल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत पार पडलेल्या बैठकांमध्ये नेतृत्व कोणी करावं, याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असं असताना नितीश कुमार समर्थकांकडून अशा प्रकारचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.