मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. ज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र हे सगळं एका दिवसात झालं नाही तर यामागे मोठं प्लॅनिंग आणि अचूक टायमिंग होत. हे सगळं कस घडलं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असताना अमृता यांनी गुपित फोडले नसतं तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती असा टोला सामनाच्या रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.
या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय ? असा मिश्किल सवालही यावेळी सामनातून उपस्थित करण्यात आलाय.
पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.