पाचगणी -कोणी काही निर्णय घ्यायचा तो घेवो पण आम्ही आमची ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरील निष्ठा ढळू देणार नाही. आमची निष्ठा शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आहे आणि ती कायम राहील. यासंदर्भात कुठेही संघर्ष करावा लागला तरी निष्ठेमध्ये तडजोड होणार नाही,अशी ग्वाही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला नवी मुंबईचे काही नगरसेवक गेले होते. त्यांच्याबरोबर माझे चुलत बंधू व आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे होते. या घटनेची बातमी पाहिल्यानंतर आ. शिंदे यांना दुःख झाले, असे सांगून ते म्हणाले, “”आमच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आ. शिंदे यांचे वडील माथाडी कामगार असताना कुटुंबांची राजकीय ओळख, शशिकांत शिंदे यांची ओळख ही फक्त शरद पवार यांच्यामुळे झाली. त्यांनी दिलेल्या राजकीय संधीमुळे झाली.
माथाडी संघटनेचे काम करत असताना शरद पवार यांनी त्यांना आमदारकीची उमेदवारी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात संधी दिली. त्यावेळी आ. शिंदे यांनी मेहनत करून यशस्वी होऊन शरद पवार यांचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी राज्यात मंत्रिपद भूषवले, जिल्ह्यात एक वेगळे स्थान निर्माण केले. या सर्व राजकीय वाटचालीत आमच्या सर्व कुटुंबाची, चुलत्यांसह त्यांच्या सर्व कुटुंबाची ओळख पवार यांच्या आशीर्वादामुळे झाली आहे.” ज्यामुळे आमची ओळख झाली त्यांना न विसरण्याचा धर्म आम्ही व आ. शिंदे यांनी पाळला आहे. मध्यंतरी आमच्यावर अनेक आघात झाले.
तरीही आ. शिंदे यांनी शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार, अजित पवार यांनी आ. शिंदे यांच्यावर सोपवलेली नवी मुंबई शहराची जबाबदारी शिंदे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
या प्रयत्नांना अडथळा म्हणूनच प्रयत्न करण्यात आला आणि यासाठी कळत नकळत कुटुंबातीलच व्यक्तीचा उपयोग त्यासाठी केला गेला, हे दुर्दैवी आहे. कोणाशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता प्रसारमाध्यमाद्वारे अशा प्रकारचे चुकीचे विधान दिले गेले. कोणत्याही परिणामाचा विचार न करता कुटुंबातील सदस्यांना विचारात न घेता हा चुकीचा निर्णय परस्पर घेतला गेला. असे चुकीचे विधान देताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार करणे आवश्यक होते. पण दुर्देवाने तसे झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.