ब्रुसेल्स – पुढील आठवड्यात होणाऱ्या “नाटो’च्या ( NATO ) अण्वस्त्र नियोजन गटाच्या गुप्त गटाची गुरुवारी बैठक झाली. रशियाचे अद्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या संदर्भात अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिल्यामुळे संभाव्य परिस्तितीवर या वेळी चर्चा करण्यात आली. रशियाच्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी रशिया कोणत्याही पर्यायांचा अवलंब करू शकतो, असे पुतीन यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभुमीवर “नाटो’च्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही बैठक झाली.
सर्वसाधारणपणे ही बैठक वर्षातून एकदा किंवा दोनवेळाच “नाटो’च्या ( NATO ) मुख्यालयात होत असते. मात्र रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली “नाटो’च्या सदस्य देशांनी युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुले ही बैठक घेण्यात आली.
“नाटो’कडून ( NATO ) रशियाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाते आहे. मात्र रशियाकडून अण्वस्त्रांबाबत कोणतीही हालचाल झाल्याचे आढळून आलेले नाही. मात्र “नाटो’च्या आण्विक युद्धसरावाप्रमाणेच रशियादेखील स्वतःचा स्वतंत्र आण्विक युद्धसराव लवकरच घेणार आहे. यावेळी स्थिती असामान्य ह्वायला नको, अशी “नाटो’ची अपेक्षा असल्याचे ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वेलेस यांनी पत्रकारांना सांगितले. ही बैठक म्हणजे केवळ आपली संरक्षण सिद्धता तपासून बघण्यापुरतीच होती, असेही वेलेस यांनी सांगितले.
अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या तीन देशांच्या ताब्यात असलेली अण्वस्त्रे पूर्ण नियंत्रणात आहेत. मात्र यापैकी फ्रान्स हा आण्विक नियोजन गटाचा सदस्य नाही. अण्वस्त्रांबाबत फ्रान्सने स्वतंत्र धोरण अवलंबले आहे. पुतीन यांनी वारंवार अण्वस्त्रांच्या वापराबाबत धमकी दिल्यामुले आता “नाटो’कडून ( NATO ) युक्रेनला अधिक युद्धसामुग्री दिली जाण्याची शक्यता आहे.
पुतीन यांची धमकी अतिशय धोकादायक आणि अत्यंत बेपर्वा असल्याचे “नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टेन्बर्ग यांनी म्हटले आहे. जर रशियाने अण्वस्6ांचा वापर केला तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील, याची स्पष्ट जाणीव रशियाला करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.