* खार्कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात काही डझन जणांचा मृत्यू
* युक्रेनच्या रणांगणातून रशियाने युद्धाची तीव्रता वाढवली
* युरोपीयन महासंघात तातडीने समावेश करा – युक्रेन
* रशियन फौजांच्या अपेक्षेपेक्षा कडवा प्रतिकार
* युक्रेनमधून स्थलांतरितांची संख्या पाच लाखांवर
किव्ह – रशियन फौजांनी सध्या युक्रेनमध्ये आपला हैदोस चांगलाच वाढवला आहे. कारण रशियाने आता युक्रेनच्या निर्वासित भागांवर ताबा मिळवण्यासाठी इथे तोफांचा मारा सुरु केला आहे. या हल्ल्यात तब्बल ३५० नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर खार्किव्ह शहरावर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात काही डझन नागरिक मरण पावले, तर शेकडो जण जखमी झाले. क्षेपणास्त्रांचा अक्षरश: अंधाधुंद वापर करण्यात आला, असे युक्रेन सरकारने म्हटले आहे.
अमेरिकेने रशियन मध्यवर्ती बॅंकेला डॉलर्समध्ये व्यवहार करण्यास मनाई करत निर्बंध वाढवले आहेत. युक्रेनमधील नागरिक आणि सैनिक रशियन फौजांना कडवा प्रतिकार करत आहेत. रशियामध्ये युद्धविरोधी निदर्शने मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सुमारे पाच लाख जणांनी देशांतर केले आहे.
* युक्रेन आणि रशियन शिष्टमंडळात सोमवारी चर्चा सुरू झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळात अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे या चर्चेत सहभागी झाले नाहीत.
* रशियन फौजांनी त्यांच्या हल्ल्यांची तीव्रता सोमवारी दुपारी कमी केली असली तरी त्यांच्या सैन्याचा वावर युक्रेनच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर आहे. किव्हपासून रशियन फौजांना 30 किमीवर रोखण्यात युक्रेनच्या लष्कराला यश आले आहे.
* रशियन फौजांनी सोमवारी केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात युक्रेनचे 102 नागरिक मरण पावले. त्यात सात बालकांचा समावेश आहे. एकूण मृतांची संख्या 352 वर पोहोचल्याचे युक्रेन सरकारने सांगितले आहे.
* युक्रेनवरील हल्ल्यात सहभागी होण्याची तयारी बेलारुस करत असल्याचा गुप्तचरांचा अहवाल असल्याचे युक्रेन सरकारने सांगितले आहे. सरकारमधील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, अशाच स्वरूपाचा इशारा बायडेन प्रशासनानेही दिला आहे.
* रशियन प्रशासनाने युद्धविरोधी निदर्शने करणाऱ्या पाच हजार 942 जणांना अटक केली. रशियातील एकूण 57 शहरात ही कारवाई करण्यात आली. एकट्या मॉस्को शहरात एक हजार 275 जणांना ताब्यात घेण्यात आले.
रशियावरील निर्बंध आणखी कडक
रशियाची मध्यवर्ती बॅंकेला अमेरिकन डॉलर्समध्ये व्यवहार करण्यापासून पूर्णपणे रोखण्यात आले. रशियन थेट गुंतवणूक निधी आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सर्व प्रकारच्या व्यवहार पूर्णपणे रोखण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. रशिया आर्थिक निर्बंधांचा मुकाबला करण्यासाठी या मर्गांचा वापर करू शकत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली आणि युरोपीय महासंघासह अनेक देशांनी अर्थिक निर्बंध लादल्याने रशियन अर्थव्यवस्थेची घरघर सुरू झाली आहे.
पाच लाख जणांचे देशांतर
*रशियाने आक्रमण केल्यानंतर सुमारे पाच लाख जणांनी शेजारच्या राष्ट्रात आश्रय घेतला असल्याचे संयुक्त राष्ट्रेने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रेच्या निर्वासितांच्या समितीने त्यांना मदत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे ट्विट केले.
* रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा संयुक्त राष्ट्रेच्या मानवता हक्क परिषदेच्या अधिवेशनासाठीचा दौरा रद्द केला आहे. युरोपियन महासंघाने हवाई हद्द वापरण्यास विरोध केल्याने हे पाऊल उचलण्यात आले.
* इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे मंगळवारी पोलंड आणि इस्टोनियाच्या दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी युक्रेनवरील हल्ल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करतील.
आण्विक केंद्राच्या ताब्याचा दावा खोटा
झापोरीझझिया हे युरोपातील सर्वात मोठे आण्विक ऊर्जा केंद्र ताब्यात घेतल्याचा रशियाचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. रशियाकडून केलेला हा दावा धादांत खोटा असल्याचे कंपनीने जाहीर केले. रविवारी रशियाने या केंद्रावर ताबा मिळवल्याचे जाहीर केले होते.
रशियात व्याजदर वाढ
मास्को- जवळजवळ डझनभर देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे रशियामध्ये भांडवल सुलभतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रशियाच्या रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी आपले मुख्य व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्के केले आहेत.निर्बंध घातले गेल्यानंतर रशियाचे चलन रुबलचे तब्बल 30 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. हे अवमूल्यन आणखी रोखण्यासाठी रशियाच्या रिझर्व्ह बॅंकेने तडकाफडकी व्याजदरात वाढ केली आहे.
रशियातील व्याजदर वाढल्यानंतर नागरिक रशियन बॅंकांमध्ये आपल्या ठेवी ठेवतील. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल, असे रशियाच्या रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. जागतिक आर्थिक निर्बंधाचा रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबले तर रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चर्चा करतानाच आक्रमण वाढवण्याची खेळी
किव्ह – एका बाजूला बेलारुस सीमेवर युक्रेनशी चर्चा सुरू असतानाच रशियाने आपल्या आक्रमणाची धार वाढवत असल्याचे नेमके विरोधाभासी चित्र समोर येत आहे. राजधानी किव्हच्या दिशेने जाणाऱ्या लष्करी वाहनांचा मैलोन् मैल ताफा उपग्रहावरून टिपलेल्या छायाचित्रातून दिसत आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाने पूर्ण शक्ती पणाला लावूनही महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवता आला नाही. त्यांना अनपेक्षित अशा कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे.
हे युद्ध सुरू झाल्यापासून उभय देशांत पहिल्यांदाच थेट चर्चा होत आहे. मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच तातडीने शस्त्रसंधी आणि रशियन सैन्याच्या माघारीची मागणी केली आहे. झेलेन्स्की यांनी या चर्चेच्या सफलतेविषयी शंका व्यक्त केली. व्यक्तीश: ते या चर्चेत सहभागी होत नाहीत.
या बैठकीच्या फलितावर माझा बिल्कूल विश्वास नाही. पण युद्ध थांबवण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी पुसटशी शंका कोणासही येऊ नये म्हणून आणि त्यासाठी छोटी संधीही सोडायची नाही म्हणून हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेतून शांतताचा एक आशेचा किरण युक्रेनच्या नागरिकांना दिसत असला तरी उभय राष्ट्रांमधील हालचाली मात्र हा तणाव तातडीने हा तणाव संपवण्याच्या दिशेने नसल्याचे सांगत आहे.
नाटो राष्ट्रांनी युक्रेनच्या फौजांना शस्त्रे आणि अन्य मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध कडक केले जात आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रविवारीआण्विक हल्ला कृती दलाला अतीसतर्क राहण्याचा संदेश दिला आहे.