रशियन सायबर हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. यानंतर युक्रेनने एलन मस्ककडे मदत मागितली. युक्रेनच्या विनंतीनंतर एलन मस्क धावून आले असून युक्रेनमधील इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. याबाबत स्वत: एलन मस्क यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
रशियाच्या हल्ल्यांचा सामना करत असलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने हात पुढे केला आहे. युक्रेनच्या विनंतीवरून एलन मस्क यांनी थेट अंतराळातून मदत पाठवली आहे. युद्धादरम्यान रशियाच्या सायबर हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीवसह पूर्व आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद पडली होती. यानंतर युक्रेनने मस्ककडे मदत मागितली, त्यानंतर त्यांनी तात्काळ युक्रेनमधील स्टारलिंक सेवा सक्रिय केली.
युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी एलोन मस्क यांना टॅग केले आणि ट्विट केले की, रशियाच्या बाजूने आपल्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. आम्हाला तुमच्या मदतीची तातडीने गरज आहे. ट्विटमध्ये लिहिले होते की, एलन मस्क, तुम्ही मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात, इथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे. तुमचे रॉकेट अवकाशातून यशस्वीपणे उतरत आहेत, मात्र रशियन रॉकेट युक्रेनमधील नागरिकांना लक्ष्य करत आहेत.आम्ही तुम्हाला युक्रेनमध्ये स्टारलिंक प्रदान करण्याची विनंती करतो, जेणेकरून आम्हाला रशियाचा सामना करता येईल
दरम्यान, युक्रेनच्या नेत्याच्या या ट्विटला एलन मस्क यांनी लगेच उत्तर दिले. त्यांनी लिहिले, स्टारलिंक सेवा आता युक्रेनमध्ये सक्रिय आहे. इतर अनेक टर्मिनल मार्गावर आहेत.