गुरुकुल शिक्षण पद्धत सर्वश्रेष्ठ!

युक्‍ती मुखी ः “ट्रेंड एक्‍स’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी (प्रतिनिधी) – गुरुकुल शिक्षण पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धती हा जागतिक शिक्षणाचा पाया आहे. परकीय शिक्षणाला आपण उगीच महत्त्व देत आहोत. खरे शिक्षण आपल्या भारत देशातच आहे, असे उद्‌गार माजी विश्‍वसुंदरी युक्ता मुखी यांनी काढले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी संशोधन व स्टार्टअप विषयक “ट्रेंड एक्‍स’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, संचालक कर्नल (नि) एस. के. जोशी, डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, प्राचार्य डॉ. विजय वढाई आदी उपस्थित होते.

युक्‍ता मुखी पुढे म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात आनंदी जीवन जगणे हा एक मूलमंत्र बनला आहे. आपल्या संस्कृतीला वेद, उपनिषदांचा आधार आहे. अध्यात्मिकतेची थोरवी लाभली आहे. सुरत येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास आरकटकर स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमवर बोलताना म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चिरंतकाल टिकणारी वाहतूक व्यवस्था उभी राहू शकते.

सौरभ बोथरा यांनी यशस्वी होण्यासाठी अध्यात्माचा आधार याविषयावर व्याख्यान दिले. उद्योजक अब्रार यासीन यांनी श्रीनगरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत उद्योग कसा उभा करून तरुणांना रोजगार दिला, याबाबतीत माहिती दिली. वरवेद टेकचे प्रमुख अभिषेक सनसनवाल, छायाचित्रकार गणेश वानरे यांनी आपली यशोगाथा सांगितली. सूत्रसंचालन हाफ्या उल्ला यांनी केले. तर डॉ. तुषार बागुल यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.