पाचगणी – जावली तालुक्यातील एकीव धबधब्यात सायंकाळी सहाच्या सुमारास दोघेजण पडले असून त्यातील एकजण सुखरूप असल्याची तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दरीत पडलेले युवकांना काढण्यासाठी ट्रेकर्सची टीम बोलवण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार युवक आले होते मद्य पिऊन त्यांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. भांडणामधेच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला भांडण करत गेले असता दोघेजण खोल दरीत कोसळले. रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस व अवघड जागा यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अडचणी येत आहेत.
जखमींपैकी त्यातील एकाशी संपर्क होत असून दुसरा गंभीर जखमी असल्याचे समजते आहे. घटनास्थळी मेढा पोलीस पोचले असून दरीत पडलेल्या युवकांना काढण्यासाठी ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे अंधार आणि पावसामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत.
एकीव धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी शनिवार रविवार पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा आशयाची बातमी मागच्याच आठवड्यात दैनिक सकाळ ने प्रसिद्ध केली होती. पोलीस प्रशासनाने त्या बातमीची दखल घेऊन शनिवार व रविवार पोलीस बंदोबस्त ठेवला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती. दरीत पडलेले युवक एक बसाप्पाचीवाडी व एक सातारा करंजे येथील असल्याची माहिती समोर येत आहे.