लेण्याद्रीत श्रींचा जन्मोत्सव उत्साहात

जुन्नर – भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी सोमवार (दि. 2) भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी झाली होती. गणेश चतुर्थीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सुमारे दीड लाख भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 5 वाजता श्रींचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मंदिरात हभप नामदेव महाराज वाळके यांचे देवजन्माचे कीर्तन झाले. पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविक भक्तांकरीता देवस्थान ट्रस्टचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्‍वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे, गोळेगाव ग्रामस्थ व कर्मचारी, तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

याप्रसंगी देवस्थानास अतुल गणात्रा (मुंबई) या भाविकाकडून 30 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते, तसेच भाविकांकरीता विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला, तसेच जुन्नर परिसरातून व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.