गणरायाचे जल्लोषात स्वागत

ढोल-ताशांचा निनाद अन्‌ गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी शहर दुमदुमले

नगर – ढोलताशांचा निनादात आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणरायाचे नगरकरांनी स्वागत केले. नगरचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. ज्या रस्त्याने जावे तेथे गणरायाचा जयघोष आणि मिरवणुका हेच चित्र पहायला मिळत होते. यात लहानांबरोबरच तरुणाईचा आणि ज्येष्ठांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता.सारे शहर मंडप, कमानींनी सजलं आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झालरींनी उत्सवी वातावरणात भर घातल्याचे चित्र शहर आणि उपनगरात दिसत होते.

गणेशभक्तांनी कालच आपल्या लाडक्‍या दैवताला पारंपरिक पद्धतीने घरी नेले तर ज्या गणेशभक्तांना पावसामुळे गणेशमूर्ती नेणे शक्‍य झाले नाही त्यांनी आज गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती.पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठ आज चांगलीच फुलल्याचे चित्र दिसत होते. आज मंडळांचे गणपती, चिमुकल्यांच्या बालगणेश मंडळांचे गणपती नेण्यासाठी गर्दी ओसंडून वाहात असल्याचे चित्र पहायला मिळाले.

गणेश मूर्तींबरोबरच सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्याच्या दुकांनांची रेलचेल दिसून आली. गांधी मैदान, माळीवाडा, कल्याण रोड, न्यू टिळक रोड, प्रोफेसर कॉलनी आदी ठिकाणी गणपती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.आज सकाळीच ग्रामदैवताच्या मंदिरात जिल्हापोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही तरूणमंडळांची सी. डी. डीजे ला फाटा देवून ढोलपथकांनाच प्रथम पसंती दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे ढोलताशांचे डाव गल्लो-गल्ली रंगल्याचे पहायला मिळाले. ढोलपथकाच्या तालबद्ध वादनाने अनेकांनी ठेका धरला त्या ताला बरोबर नाचणाऱ्या भगव्या पताकांनी साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले. शहरातील महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड येथील रणांगण युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, पवन गांधी, प्रभुजी शहा, मळू गाडळकर, बंटी ससाणे, बाळासाहेब कानडे, प्रवीण गुंजाळ, विकास रोकडे, दादा पांडूळे, नितीन गाडळकर, रोहित रासकर, योगेश गाडळकर, महेश कापरे, मयूर गरुड, महेश जाधव, प्रशांत रासकर, सोमनाथ गाडळकर, सागर गुंजाळ, अनिकेत घुले, विनायक राहिंज, दीपक दरेकर, लकी खूबचंदानी आदी उपस्थित होते.

खाकीदास बाबा मठ, लालटाकी येथील मारया प्रतिष्ठानच्या वतीने शहरातून श्रीगणेशाची पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकित पुरुष पांढरे कपडे व फेटे तर महिला-युवती भगवे फेटे व गुलाबी साड्या परिधान करुन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. गणपती बाप्पांच्या जयघोष करीत निघालेल्या या मिरवणुकीने नगरकरांचे लक्ष वेधले. लहान मुले भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी होते. बाप्पांच्या आगमनासाठी मिरवणुकीत सर्व महिला-पुरुषांनी संगीताच्या तालावर ठेका धरला होता. ही मिरवणुक मंडळाचे अध्यक्ष विशाल चत्तर, उपाध्यक्ष बाळासाहेब आगळे, गोपाळराव ढगे, चंद्रकांत मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

नगर अर्बन बॅंकेत शतकोत्तर श्री गणेश उत्सवास सुरुवात झाली. बॅंकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या हस्ते विधीवत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी अर्बन बॅंकेवरील सर्व संकटे दूर होवून बॅंकेचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी सुभाषचंद्र मिश्रा यांनी श्री गणेशाच्या चरणी संकल्प केला. बॅंकेचे प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे आदिंसह बॅंकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद आवारात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पूजा करून करण्यात आली यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष यशवंत सालके सुभाष कराळे एम पी कचरे मच्छिंद्र चिलवर कैलास झुंगे राजू जरे अनंत सदनापुरकर सुदाम बोंदर्डे भारत बोरुडे प्रविण खेडकर अनिल येनगंदुल आदी उपस्थित होते.

पावसासाठी प्रार्थना
गणेशोत्सव, मोहरम सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत अशी प्रार्थना करतानाच जिथे पाऊस नाही तेथे पाऊस पडू दे आणि जेथे पावसाने कहर केला तेथे नागरिकांना सावरण्याची संधी दे अशी प्रार्थना केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

मुहूर्त पाळण्याकडे कटाक्ष
घरगुती गणपती प्रतिष्ठापनेची दुपारी दीड वाजेपर्यंतच शुभवेळ असल्याने अनेक गणेश भक्तांनी आणि काही सार्वजनिक मंडळांनी देखील ही वेळ पाळण्याकरिता कटाक्षाने दुपारी दीडच्या आतच गणरायाची प्रतिष्ठापना केली. यांत काही शासकीय, अशासकीय आस्थापनाही सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.