सांगवी पीडब्ल्यूडी मैदान : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित पवनाथडी-2020 जत्रा उत्साहात सुरू आहे. जत्रेमध्ये प्रवेशद्वारापासूनच वैविध्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे. पवनाथडी जत्रेला ग्रामीण “लूक’ देण्यात आला आहे. जत्रेत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला मामाचे गाव साकारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश केल्यापासूनच जत्रेचा माहौल पाहायला मिळत आहे. एका बाजूला चौघडा वादन, वाघ्यामुरळी, गोंधळी यामुळे ग्रामीण भागाचा अनुभव येतो. शहरात राहणाऱ्या मुलांना ग्रामीण भागातील गावाचा अनुभव देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
पवनाथडी जत्रेत वाडा, बैलगाडी, बांबूपासून केलेली झोपडी, विहीर, हातमाग, विणकाम साकारण्यात आली आहे. शहरातील उल्लेखनीय असलेली महापालिका इमारत, भक्ती-शक्ती शिल्प, एच.ए. कंपनी यांची प्रतिकृती आहे. त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. एकंदरीत लक्षवेधी सजावट करण्यात आली आहे. केवळ खरेदीविक्री आणि स्टॉल यापुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पवनाथडीत पाहायला मिळत आहे. महिलांना तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवनाथडी जत्रेदरम्यान दररोज सायंकाळी वेगवेगळ्या स्थानिक आणि इतर संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची संधी महापालिकेने दिली आहे. त्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पहिल्या दिवसापासूनच पवनाथडीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. पवनाथडी जत्रेत दुसऱ्या दिवशी थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने “ऐतिहासिक स्त्री पर्व’ कार्यक्रम सादर केला. पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील स्त्रियांपासून ते आजच्या स्त्रियांना करावा लागणारा संघर्ष यातून दाखवण्यात आला. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात कार्यरत असल्या तरीही त्यांच्या बाबतीत होणारा अघटीत प्रकार थांबणार कधी असा सवाल त्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर “लक्ष्मणरेषा’ या सदाबहार कार्यक्रमातून भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये सन्मिता धापटे, प्रसिद्ध गायिका रूपाली घोगरे, मिनल देशमुख, गणेश मोरे व महाराष्ट्राचा ख्यातनाम मिमिक्रीकार योगेश सुपेकर यांचा सहभाग होता. दरम्यान, नितीन वाघ लिखित व दिग्दर्शित स्वच्छतेचा संदेश देणारे मुकनाट्य शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केले. या मुकनाट्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. आज (रविवारी) पवनाथडी जत्रेचा शेवटचा दिवस आहे.
खाद्यपदार्थांची मेजवानी
पवनाथडी जत्रेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. विविध भागातील शाकाहारी व मांसाहरी जेवणाची लज्जत या ठिकाणी चाखायला मिळत आहे. दापोडी येथील स्वरूप सिंधू महिला बचत गटाने अप्रतिम बिर्याणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच चुलीवरील ताजी भाकरी, तांबडा पांढरा रस्सा व तंदूरी जत्रेमध्ये उपलब्ध आहे. चुलीवरील पिठले भाकरी ठेचा व उकडीचे मोदक हे ही लक्ष वेधून घेतात.
विविध वस्तूंनी बहरली जत्रा
मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, कपडे, सौदर्यप्रसाधने, कलाकुसरीच्या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधत आहे. लहान मुलांसाठी आकाश पाळणे व विविध खेळ जत्रेमध्ये उपलब्ध आहेत. बच्चेकंपनी याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. ग्रामीण भाग शोभून दिसावा यासाठी झोपडी व वाडा यांच्या बनविलेल्या प्रतिकृतीसमोर अनेक नागरिक सेल्फी काढत होते.
वाळवणच्या पदार्थांना मागणी
यंदाच्या पवनाथडीमध्ये वैविध्यपूर्ण वस्तूंची रेलचेल बघायला मिळत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच खास शिवलेले खणाचे कपडे, वुडन आर्टच्या आकर्षक वस्तू, मातीच्या वस्तू, डाएट फराळाचे पदार्थ, लाकडी खेळणी जत्रेमध्ये उपलब्ध आहेत. तसेच खास गावाकडची चव असलेले पापड, लोणची, मसाले यांचीही रेलचेल आहे. तसेच शहरात न मिळणाऱ्या अशा गव्हाच्या कुरड्या, हाताने बनवलेल्या गव्हाच्या शेवया यांना महिलांकडून पसंती मिळत आहे.