डॉ. इंद्रजित मोहिते यांची माहिती; कै. भाऊंचे विचार, तत्त्वे स्वीकारणाऱ्यांचे स्वागत
कराड – य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. तर ती सर्व सभासद शेतकऱ्यांची आहे. या निवडणुकीत स्व. यशवंतराव मोहिते यांचे विचार आणि तत्त्वे स्विकारणाऱ्या कोणत्याही राजकीय गटांना निवडणुकीत बरोबर घेण्याची आमची तयारी आहे. यासाठी समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, स्व. यशवंतराव मोहिते यांचे राज्याच्या जडणघडणीत जसे योगदान आहे, तसे सहकार रूजवण्यात त्यांचे मोठे काम आहे. भाऊंनी कृष्णा साखर कारखाना उभारला, वाढवला, फुलवला तसेच कारखाना संकटात सापडल्यानंतर त्याला बाहेर काढण्याचेही काम त्यांनी केले आहे.
कृष्णा कारखान्यात सध्या लोकशाहीला लाथाडणाऱ्या मंडळींची सत्ता आहे. सर्वसाधारण सभेला सभासदांना अटकाव केला जातो. प्रवेशव्दारावर पैलवान उभे केले जातात. सभासद हा कारखान्याचा मालक असतानाही त्याला आपले मत मांडता येत नाही, असे चित्र आहे. राज्यातील खासगी साखर कारखानदारी वजा केली तर मध्य महाराष्ट्राचा कणा सहकार आहे. आणि शेतकऱ्याला मालकी हक्क देणारा सहकार भाऊंना अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा कारखाना निवडणुकीची तयारी सुरू केली का? या प्रश्नावर बोलताना डॉ. मोहिते म्हणाले, स्व. यशवंतराव मोहितेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात भाऊंच्या मुलाने राजकारण न केल्याने त्यांच्या मुलांना लोक विसरत चालले असल्याची खंत खा. शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी कृष्णा कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय मी जाहीर केलेला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघातून मी येतो तेथे खा. श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण येतात त्यांना डावलणे उचित नाही. मात्र, मी साखर महासंघावर काम केले आहे. कृष्णा कारखान्याचा कारभार चांगल्या पध्दतीने पाहिला आहे. साखर कारखानदारीचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे.
प्रचारात आघाडी दिसत नाही यावर डॉ. मोहिते म्हणाले, अजून निवडणूक कार्यक्रम लागलेला नाही. मतदारयाद्या तयार नाहीत. मात्र, ज्यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे, ते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यात शेतकरी सभासदांच्या हिताचा सकारात्मक प्रचार दिसत नाही. योग्य वेळ आल्यानंतर प्रचाराला सुरूवात करू.