पुसेगाव (प्रकाश राजेघाटगे) – दिवाळीनंतर तुलसीविवाह पर्व संपल्यावर लगेचच समारंभ सुरू झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु झालेले आहेत. परंतु मुलींचे प्रमाण हजारांच्या मागे सातशे असे असल्याने ग्रामीण भागात “नवऱ्याला मिळेना नवरी’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. वय उलटूनही विवाहाचा योग जुळून येत नसल्याने निराशेचे चित्रही निर्माण झाले आहे. दुसरीकडे लग्न जुळण्याच्या प्रयत्नात फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. तर वाढत्या अपेक्षांमुळे अलीकडे विवाह करणे पूर्वीसारखे सोपे राहिले नाही .
गेल्या काही वर्षापूर्वी मुले व मुली यांच्या संख्येत तफावत होऊ लागल्याने तरुणाची लग्ने रखडत आहेत. आता देखील ग्रामीण भागातील तरुणांची लग्न आता अनिश्चित काळासाठी या कारणामुळे लांबणीवर पडत आहेत. त्यातच ग्रामीण भागातील मुलीकडून मुलगा सुशिक्षित असला तरी केवळ शेतकरी आहे म्हणून नाकारले जात आहे. मुलगा नाकारण्याचा हा प्रकार सामाजिक, आर्थिक परिस्थितीची वेगळी झलक दाखवणारा आहे.
आता मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे ठरविण्यात आले आहे. लग्नाच्या बेडीत अडकेपर्यंत मुली वेगवेगळी शैक्षणिक प्रशिक्षण अथवा कोर्स करताना दिसून येतात. तर काही मुलींची उच्चशिक्षणाकडे ओढ असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या नोकरी करताना दिसतात. काही युवतींनी मोठया पदाच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत. त्यांना मनपसंत जोडीदाराची अपेक्षा असते. दुसरीकडे मुलांचे विवाह ठरत नसल्याचे ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. त्यामुळे हुंडा नको, मामा फक्त मुलगी द्या अशी विनवणी करण्याची वेळ नवऱ्या मुलांवर आली आहे.
एक तर प्रमाणात झालेल्या भ्रृणहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमविताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. लग्नाचे वय निघून जात असताना मुलगी मिळत नसल्याने अनेक कुंटुबे अस्वस्थ आहेत. मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबक्या आवाजात आपल्याला “हुंडा नको फक्त मुलगी हवी ‘असे मत सांगताना दिसत आहेत. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील मुली सुध्दा लग्नाची घाई न करता शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुली नापसंत करत आहेत. त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकारची धास्ती घेतली आहे. तरीही विवाह जुळणे ही फार मोठी कसरत बनून राहिली असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.