यंदाच्या “बिग बॉस’चा भाग झाल्यापासूनच एम. सी. स्टॅन अनेक तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. समाज माध्यमांवर तर स्टॅनला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्याचमुळे या लेखनप्रपंचाला शीर्षक देताना, आपसुकच स्टॅनच्याच “बस्ती का हस्ती’ गाण्याच्या ओळी ओठांवर उमटतात. यंदाचा बिग बॉस विजेता एम. सी. स्टॅन याची ही रोमहर्षक कहाणी…
वेळेला दंडी मारणे, अंघोळ न करणे, अभ्यासात मन न रमणे, दिवसभर बाहेर फिरून रात्री उशिरापर्यंत नदी पात्रामध्ये मित्रांसमोर गाणे गात बसणे हा अल्ताफ उर्फ स्टॅनचा सुरुवातीच्या दिवसांतील दिनक्रम. स्टॅनच्या गाण्यांची भाषा विचाराल तर अगदीच भाईगिरीची; त्यात अनेक नको त्या शब्दांची लाखोली, त्यामुळे वडिलांचा सततचा खावा लागणारा मार. हा मुलगा पूर्ण वाया गेला आहे अशी समाजातील प्रतिमा असणाऱ्या स्टॅनने केवळ विजेतेपदच पटाकाविले नाही तर झोपडपट्टीत म्हणजेच “बस्ती’त राहणाऱ्या हजारो मुलांना त्यांनी आपले पॅशन पाळले, तर तेही “हस्ती’ बनू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे. अर्थात त्याचमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला.
“पंचशील बिल्डिंग’, रेल्वे सोसायटी शेजारील तिसरा मजला, खोली क्रमांक 28, ताडीवाला रस्ता, पुणे हा पत्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी जर कोणी विचारला असता तर तो कोणालाही नीट सांगता आला नसता. परंतु सलमान खान होस्ट असलेला छोट्या पडद्यावरचा सर्वांत वादग्रस्त शो “बिग बॉस’च्या सोळाव्या हंगामाचा अल्ताफ शेख उर्फ एम. सी. स्टॅन विजेता ठरला आणि पुण्यातील हा दुर्लक्षित झोपडपट्टी परिसर तेथील तरुणांनी केलेल्या अभूतपूर्व जल्लोषामुळे प्रकाशझोतात आला. पूर्वी पुण्यात राहणारा स्टॅन आता मुंबईत स्थायिक झाला आहे.
भारतामध्ये झोपडपट्टीतून तथाकथित प्रतिष्ठित समाजामध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण करणाऱ्या नायकांची संख्या कमी नाही. अनेक चित्रपटांच्या कथा आजही मुंबईतल्या धारावी तसेच अन्य झोपडपट्ट्यांतील कहाण्यांवर आधारित असतात. “स्लमडॉग मिलेनियर’, “गली बॉइज’, “झुंड’ सारख्या चित्रपटांच्या कथा या अशाच दोनवेळा पोट भरण्याची भ्रांत असणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित आहेत. येथील तरुणांवर जन्मतःच अट्टेल गुन्हागाराच शिक्का बसलेला असतो. आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना व त्यातून निर्माण होणाऱ्या सोशिकतेला वाचा फोडण्यासाठी ही पोरं “रॅप’ नावाच्या संगीत प्रकाराला जवळ करतात आणि शब्दांमधून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अथवा त्यांच्यावरील अन्यायाचे कारण असणाऱ्या समाजाला येथेच्छ शिव्यांची लाखोली वाहून शब्दरूपी व्यक्त होतात.
सध्या रॅपर्सवर त्यांच्या गाण्यांतील गलिच्छ भाषेमुळे अनेकदा टीका होते. त्यावर प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळांची एक प्रतिक्रिया आठवते. ढसाळ म्हणतात, “तुम्ही माझ्या भाषेला गलिच्छ म्हणाल, परंतु ती मुंबई आणि अनेक झोपडपट्ट्यांतील रहिवाशांच्या रोजच्या जगण्यातील जीवनवाहिनी आहे. तुमच्यासाठी गलिच्छ असली तरी ती आमची मातृभाषा-बोलीभाषा आहे. अशाच भागांत भारतातील बहुतांश समाज राहतो, हे विसरून कसे चालेल?’ त्यामुळे प्रस्तापित संगीत सम्राटांना ही भाषा गलिच्छ वाटेलही परंतु हीच भाषा वापरून रॅप संगीत तयार करणाऱ्या स्टॅनला युवा पिढीने डोक्यावर घेत संगीतातील मुख्य “हस्ती’ बनवलंय, हेही सत्य आहे.
1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेले “बिग बॉस’ 16 चे पर्व 12 फेब्रुवारी रोजी संपले. या 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाच्या अंती “बिग बॉस 16′ ची ट्रॉफी अमरावतीचा शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी घरी घेऊन जातील अशी चर्चा असताना सलमानने स्टॅनला विजेता घोषित करत चाहत्यांना धक्का दिला. हिरे आणि सोन्यापासून बनविण्यात आलेली ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅनच्या चेहऱ्यावरील आनंद फार वेगळा होता. सुंदर हिऱ्यांचे नक्षीकाम असणाऱ्या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार इतकी आहे.
रॅपर्स आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. अर्थात स्टॅनही त्याला अपवाद कसा असणार? त्याचे आयुष्यही अनेक वादग्रस्त घटनांनी भरलेले आहे. स्टॅनच्या गाण्यांमुळे देखील अनेक वाद रंगले असले तरी, बिग बॉसच्या घरात त्याच्या गोल्डन चेन आणि ड्रेसिंग स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधले. सांगायचं झाले तर, बिग बॉसच्या घरात स्टॅन 80 हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. अनेकदा सलमान खानला देखील स्टॅनच्या लाइफ स्टाइलवर वक्तव्य करण्याचा मोह आवरला नाही.
एम. सी. स्टॅनच्या महागड्या कपड्यांवर व लाइफ स्टाइलवर सर्वांचे लक्ष राहिले. कधीकाळी घालण्यास कपडे नसणारा स्टॅन आज जवळपास 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचा मालक आहे. एम. सी. स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शिवाय तो नवीन गाणी देखील प्रदर्शित करत असतो. बिग बॉसच्या घरात देखील स्टॅनने कॉन्सर्ट आयोजित केल्याचे आपण सर्वांनी पाहिले.
“बिग बॉस 16′ च्या घरातील स्टॅनचा प्रवास फार चकित करणारा राहिलेला आहे. फिनाले सुरू होताच काहीच तासांच्या आधी शालीन आणि त्यानंतर अर्चना घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकालाही घराबाहेर जावे लागले. ती विजेता होईल असे लाखो चाहत्यांना वाटत होते, वोटिंग ट्रेंडही तिच्या बाजूने होते. मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्टॅनच्या नावाचा शिक्का लागला. तर त्याचा मित्र मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या शोच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या स्टॅनची बोलण्याची शैलीही अनेकांना भावली.
सुरुवातीला संदिग्ध वाटणाऱ्या स्टॅनचा खेळ गेल्या काही दिवसांत कामलीचा सुधारला. “बिग बॉस 16′ च्या घरात एन्ट्री केली आणि स्टॅनने होस्ट सलमान खानचे मन जिंकले. एमसी स्टॅनच्या संघर्षापासून यशापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर सलमानने त्याचे तोडभरून कौतुक करताना, “मला त्याचा अभिमान असल्याचे’, म्हटले होते. स्टॅनला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणे गायले आहे. पण “वाता’ या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर 21 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
स्टॅन कोट्यवधींचा मालक
23 वर्षीय एम. सी. स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. सुुरुवातीला त्याच्या गाण्यांमुळे कुटुंबियांसह अनेकांच्या टीकेचा धनी झालेल्या स्टॅनने त्याची आवड जोपासली. त्याचमुळे तो लोकांच्या पसंतीस उतरला. एकेकाळी पैसे नाहीत म्हणून रस्त्यावर झोपून रात्र काढावी लागणाऱ्या स्टॅनकडे तिरस्काराने पाहणारे आता त्याची स्तुती करताना थकत नाहीत.
स्टॅनचा प्रवास
एम. सी. स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केले. तसेच “समझ मेरी बात को’ या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, ज्यामाध्यमातून त्याने “एम्मीवे’ व डिवाइन सारख्या गायकांना पछाडले होते. त्यानंतर त्याचे “अस्तगफिरुल्ला’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याच्या माध्यमातून त्याने त्याचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या आर्थिक अडचणी आणि भूतकाळावर भाष्य केले. “तडीपार’ या अल्बममुळे एम. सी. स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. त्यानंतर त्याने गायलेले प्रत्येक गाण्याने युट्यूबवर कोटींमध्ये व्हूज मिळवले. मध्यंतरी त्याने गमतीत म्हटलेला “अस्सी हजारकें शुज हैं’, हा डायलॉग प्रचंड व्हायरला झाला होता.
गर्लफ्रेंडमुळे अडचणीत
एम. सी. स्टॅनवर काही महिन्यांपूर्वी प्रचंड टीका झाली होती. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजे औझमा शेखने त्याच्यावर असंख्य आरोप केले होते. आरोपात स्टॅनने मॅनेजरला तिला मारहाण करण्यास सांगितल्याचे म्हटले होते. या आरोपांचा एम. सी. स्टॅनच्या इमेजवर परिणाम झाला होता. त्यामुळेच त्याने बिग बॉसमध्ये जाण्याचे ठरवले.
“टीआरपी’चा खेळ
बिग बॉसच्या घरातील सर्व गोष्टी स्क्रीप्टेड असल्या तरी, घरातील भांडणे व प्रकरणांमुळे लोकांना हा शो पहायला प्रचंड आवडतो. घरातील भांडणे ही अनेकदा “टीआरपी’खेचण्यासाठी असतात. गेल्या महिन्यातील यादी पाहिल्यास सर्वाधिक “टीआरपी’ खेचणाऱ्या शोंच्या अव्वल पाच यादीत 2.2 मिलियन विवरशीपसह बिगबॉसचा भारतात पाचवा क्रमांक लागतो. अर्थात यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात टीआरपी खेचणाऱ्यांचाच व जे जनसामान्यांच्या पसंतीस उतरलेले आहेत, अशांचा भरणा पहायला मिळतो. ज्यामध्ये पुण्याचे गोल्डन बॉइज, अब्दू रोझीक यांचा आवर्जून उल्लेख करता येईल.
माझ्या आयुष्यात सुरुवातीपासूनच अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत. बिग बॅस-16 चा विजेता बनने ही त्यातीलच एक गोष्ट आहे. मी सध्या मुंबईत राहात असलो तरी, ही ट्रॉफी पी टाउनची आहे.
-अल्ताफ शेख (एम. सी. स्टॅन),
बिग बॉस-16 चा विजेता
सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसचा आपण भाग असावे हे माझे स्वप्नं होते. ते पूर्ण झाले, अर्थात विजेता ठरलो नाही याचे दुःख असले तरी स्टॅनच्या रुपाने ट्रॉफी महाराष्ट्रालाच मिळाल्याचा आनंद आहे.
-शिव ठाकरे, उपविजेता, अमरावती