थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता…
रेडिओवर गाणं लागले होते. कुणी प्रेमिका आपल्या प्रियतमाला आळवून सांगत होती. ती दिवस रात्र जागत होती, वाट पाहून तिचे डोळे शिणले होते. काही वर्षांपूर्वीचे हे गाणे आहे. त्यावेळी प्रियकर प्रेयसी चोरून भेटत असत. एकमेकांना भेटण्यासाठी वाट पाहावी लागत असे. तो विषय वेगळा… पण वाट पाहणं काही चुकत नाही हे मात्र खरं. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सतत कशाची ना कशाची वाट पाहावी लागते.
तर हे असं वाट पाहणं मनाची हुरहूर वाढवतं. कधी कधी वाट पाहण्याचा खूप कंटाळा पण येतो. पूर्वी जेव्हा संपर्क साधने मर्यादित होते तेव्हा वाट पाहावीच लागे. मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर, मुलाकडचे लोक जेव्हा असं सांगत की, उद्या सकाळी 10 पर्यंत आम्ही आमचा होकार असेल तर कळवू. तेव्हा त्या मुलीची आणि तिच्या घरच्यांची काय अवस्था होत असेल. उद्या सकाळी 10 वाजण्याची वाट पाहता पाहता त्यांच्या मनावर किती दडपण येत असेल. त्याकाळी घरोघरी फोनही नसत, निरोप देण्यासाठी चालत जावे लागे. पण असे प्रसंग नित्याचेच.
आता वाट पाहावी लागते ती स्टेशनवर गेल्यावर गाडीची किंवा एअरपोर्टवर फ्लाइटची. नोकरीसाठी इंटरव्ह्यूच्या मेलची. नाहीतर फ्लॅट किंवा गाडी बुक केल्यावर ती हातात येण्याची.आता जीवनमान उंचावले आहे. दैनंदिन किंवा लक्झरी वस्तूसुद्धा बाजारात पैसे दिले की सहज उपलब्ध असतात.
संसारात काटकसर करून, एकेक वस्तू जमवण्याची आणि ती मिळवण्याची धडपड आता जवळजवळ संपली आहे. तशी वाट कुणी आता पाहत नाही. अगदी घरात बसूनसुद्धा तुम्ही तुम्हाला हवे ते खरेदी करू शकता. पण तरीही वाट बघण्यातही कधी खूप आनंद असतो.
आई किंवा बाबांच्या एखाद्या अवघड ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांच्या “ऑल इज वेल’ची बाहेर बसलेली त्यांची मुले वाट पाहतात ना तेव्हा त्यांच्या मनावरचा ताण ते दाखवित नाहीत; पण कुठेतरी तो हलका होत असतो.
मुला मुलींची लग्न वेळेत होण्यासाठी आई वडील खूप प्रयत्न करतात. चुकून एखाद्याचे लांबलेच तर फार वाट पाहतात आणि प्रत्यक्ष पाठविणेचे वेळी कृतार्थ अश्रू ढाळतात. ती वाट पाहणं हे त्यांच्या कर्तव्य पूर्तीचं समाधान असतं.
अशी वाट प्रत्येकालाच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बघावी लागते. ती जणू आयुष्याची अविभाज्यताच आहे. आता बघा ना, आपण सारेच करोनाकधी संपेल याची वाट पाहतोय. लसीचा पहिला डोस घेतल्यावर, 84 दिवस होण्याची वाट पाहतोय. कारण माणूस हा भविष्याकडे बघणारा आहे. आजचा वाईट काळ संपेल आणि पुन्हा नव्या दमाने आयुष्य सुरू होईल याची तो वाट पाहतोय.
आरती मोने