मुंबई – अमेरिकेतील व्याजदर कपात लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत होता. अशातच इराण आणि इस्त्रायलदरम्यान संघर्ष सुरू झाल्यामुळे इतर चलनाच्या तुलनेत डॉलर बळकट होत आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही गेल्या दोन दिवसापासून होत आहे. (Rupee continues to fall)
काल रुपयाचा भाव सहा पैशांनी कोसळला होता. आज पुन्हा रुपयाचा भाव 14 पैशांनी कोसळून 83.57 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. केवळ रुपयांच्या तुलनेतच डॉलर वधारत नाही तर इतर आंतरराष्ट्रीय चलनाच्या तुलनेतही डॉलर वधारत असल्याचे दिसून येत आहे. जगभरातील गुंतवणूकदारांचा ओढा आता सोने आणि डॉलर व डॉलर संबंधातील वित्तीय उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येते.
शेअरखान या संस्थेचे चलन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, अमेरिकेतील वित्तीय साधनात गुंतवणूक होत असल्यामुळे अमेरिकेच्या दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा 4.66% या एक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. इतर देशांच्या चलनावर आणि इतर देशांच्या कर्जरोख्यावरही परिणाम होत आहे. भारताच्या दृष्टिकोनातून आणखी एक नकारात्मक बाब म्हणजे इराण -इस्त्रायल संघर्षामुळे खनिज तेलाचे दर वाढू शकतात आणि त्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो.