मुंबई – भारतात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे आयातदार आणि निर्यातदार डॉलरची खरेदी करीत असल्यामुळे भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे.
गुरुवारी रुपयाचा भाव सहा पैशांनी घसरून रुपयाचा दर 74.94 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. रिझर्व बॅंक माफक प्रमाणात हस्तक्षेप करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रुपयाचे मूल्य आणखी कमी झाले असते मात्र गुरुवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्यापैकी वाढल्यामुळे रुपयाला आधार मिळाला.
तरीही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचा चालूच ठेवली आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारानी 1,082 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. जर रुपयाचे मूल्य आणखी घसरले तर भारताला आयात महागात पडू शकते. त्यातल्या त्यात क्रुड महाग होऊ शकते. अशा अवस्थेत देशातील इंधनाचे दर आणखी वाढू शकतो.