Stock Market | शेअर बाजार निर्देशांकांत सुधारणा; जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश

मुंबई – जागतिक बाजारात गुरुवारी सकारात्मक संदेश मिळाले त्याच बरोबर निर्देशांकाशी संबंधित आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे गुरुवारी निर्देशांकांना आधार मिळाला. त्यामुळे निर्देशांकात माफक प्रमाणात वाढ झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 374 अंकांनी म्हणजे 0.79 टक्‍क्‍यांनी वाढून 48,080 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 109 अंकांनी वाढून 14,406 अंकांवर बंद झाला.

बजाज ऑटो, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही गुरुवारी वाढ झाली. मात्र टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंटस्‌, टेक महिंद्रा, नेस्ले या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. या घडामोडींचे विश्‍लेषण करताना रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे आणि भारतातील वित्त कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली.

माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकांत थोडीफार वाढ झाली असल्याचे दिसून आले. मात्र तरीही बरेच गुंतवणूकदार नफेखोरी करीत आहेत. औषध कंपन्यांची नफेखोरीसाठी निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये करोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या भारतामध्ये करोना रुग्णांची संख्या दीड कोटीवर गेली आहे.

त्यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाऊन सुरू केले जात आहे. त्यातच ऑक्‍सीजन आणि इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. जागतीक बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आले. क्रुडच्या किमती सध्या 64 डॉलर या पातळीवर स्थिरावल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.