प्रतिबंधित क्षेत्रांच्या अध्यादेशावरून उडाला गोंधळ
पुणे – नव्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या अध्यादेशावरून “शहरातील काही भागात पुन्हा लॉकडाऊन होणार’ अशी शहरात अफवा पसरली. असे कोणतेही आदेश देण्यात आले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. महापालिकेने नव्या प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश करून आणि ज्या ठिकाणी आता करोनाचे रुग्ण नाहीत ते क्षेत्र वगळून नव्या 74 प्रतिबंधित क्षेत्रांची यादी गुरुवारी जाहीर केली.
मात्र, ही यादी म्हणजे या भागात पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी अफवा दिवसभर पसरली आणि गोंधळ उडाला. त्याविषयीचे अनेक कॉल्स महापालिका, महापालिकेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना आले. ही अफवा असल्याचे सांगताना या सगळ्यांना अक्षरश: नाकीनऊ आले.
वास्तविक महापालिका प्रत्येक महिन्याला नव्या प्रतिबंधित क्षेत्राची यादी जाहीर करते. ही यादी आठवड्याला जाहीर करण्याविषयीही चर्चा करण्यात आली होती. मात्र, ती महिन्याला एकदा जाहीर केली जाते. त्यामुळे करोनाच्या उपाययोजनांमध्ये ही यादी दिली जाते. मात्र, यावेळी ही यादी म्हणजे “पुन्हा लॉकडाऊन’ होणार असल्याची अफवा म्हणूनच पसरली. या यादीमध्ये प्रतिबंधित क्षेत्राशिवाय नागरिकांनी घ्यायची काळजी, सुरक्षेचे नियम हे देण्यात आले होते. वास्तविक सर्वच अध्यादेशांमध्ये ते नमूद केले जात होते, असे असतानाच या अध्यादेशाविषयी अफवा पसरवण्यात आली.