गंभीर आरोप-प्रत्यारोपांनी वैतागले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख
नगर (प्रतिनिधी) –दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने उपनेते पदाची जबाबदारी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या खांद्यावर दिली. मात्र, नव्यानेच पदभार स्वीकारलेले उपनेते गडाख यांना आज नगर शहरातील गटा-तटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागले.
नगर शहरातील नेतृत्वाची जबाबदारी कुणाची? हा कळीचा मुद्दा अजून निकाली निघालेला नाही. त्या मुद्याच्या आडूनच आज नगर शहरातील पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिकांनी उपनेते तथा राज्याचे जलसंधारणमंत्री गडाख व संपर्कनेते भाऊ कोरगावकर यांच्या पुढ्यात गंभीर आरोप-प्रत्यारोपांचा “धुराळा’ उडविला.
उपनेते राठोड यांच्या अकाली जाण्याचे नगरमधील शिवसेनेची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी तसेच आगामी महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी गडाख यांनी आज सोनईत पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व मोजक्याच कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली होती. भल्या सकाळी झालेल्या या बैठकीस संपर्कप्रमुख कोरगावकर यांच्यासह माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, सचिन शिंदे, दत्ता जाधव यांच्यासह पदाधिकारी व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
आढाव्याच्या प्रारंभीपासूनच सर्वजण एकमेकांशी फटकूनच वागत होते. त्यात चर्चा सुरू झाल्यानंतरही अगोदर कुणी बोलावे, यावरून घमासान सुरूच होते. थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने उपनेतेपदाची धुरा खांद्यावर घेतलेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे स्वत: वैतागले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सातत्याने समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, अखेरपर्यंत अपेक्षितपणे ते फळाला आलेच नाहीत. अखेरीस तुमच्यात समेट झाल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही, अशी ठाम भूमिका गडाख यांनी घेतली. समेट घडविण्यासाठी शिवसैनिकांना अवधीही देण्यात आला आहे. शिवसेना एकजूट झाल्यानंतर नगरच्या महापालिकेवर भगवा फडकाविण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही देखील गडाख यांनी दिली.
महापौरपदाच्या उमेदवाराचा फैसला करणार “ईश्वरचिठ्ठी’
महापौरपदाच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडे रोहिणी शेंडगे व रिता भाकरे हे दोनच संभाव्य उमेदवार आहेत. तथापि, महापौरपदाचा उमेदवार “ईश्वरचिठ्ठी’द्वारेच निवडला जावा, अशी भूमिका शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी उपनेते गडाख यांच्यासमोर मांडली. त्यावर गडाख यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यावर लगेच निर्णय झाला नाही. सर्वसमावेशक विचार करून त्यावर निर्णय होईल, अशी माहिती एका नगरसेवकाने दिली. या संदर्भात पक्षाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
20 सप्टेंबरला शोकसभा
उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभा घेण्यासाठी शहरप्रमुख दिलीप सातपुते प्रयत्नशील होते. तथापि, त्याची तारीख निश्चित होत नव्हती. आज नेत्यांसमोर त्यावर चर्चा करण्यात आली. येत्या 20 सप्टेंबरला ही शोकसभा होईल. तथापि, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यावरून त्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले.