- करोना इफेक्ट : ज्येष्ठ नागरिक, पालकांसोबत रोजच वाद
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांनी उद्याने खुली केली आहेत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मॉर्निग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व मुलांसोबत येणाऱ्या पालकांसोबत सुरक्षा रक्षकांचे वाद होताना दिसत आहेत. नियम आणि नागरिक यामध्ये उद्यानांच्या सुरक्षा रक्षकांची फरफट होताना दिसत आहे. अनेकदा वाद विकोपाला जातात व सुरक्षा रक्षकांना नागरिकांचा रोष पत्कारावा लागत आहे. उद्यानांना खासगी सुरक्षा रक्षक असल्याने त्यांना कोणतेही शासकीय संरक्षण नाही, यामुळे सुरक्षा रक्षक वैतागल आहेत.
करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने उद्याने खुली केली आहेत. परिस्थिती आता पूर्ववत असल्याने आणि गेल्या सहा ते सात महिन्यांपासून घरात असलेले ज्येष्ठ नागरिक बाहेर पडत आहेत, तर पालक देखील लहान मुलांना घेऊन उद्यानात येऊ लागले आहेत.
मात्र ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना उद्यानात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मॉर्निग वॉकसाठी उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे येथील सुरक्षा रक्षकांशी वाद होत आहे. आम्ही काय घरात बसूनच मरायचे का, असा सवाल ते सुरक्षा रक्षकांना करीत त्यांच्याशी हुज्जत घालत आहेत.
त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमनता दांडगाईने उद्यानात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागायचे, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे.
आमची नोकरी अडचणीत
याबाबत एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, उद्यानात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे फोटो काढून काहीजण महापालिकेकडे तक्रार करीत आहेत. त्यामुळे आमची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. जर ज्येष्ठ नागरिकांशी सक्तीने वागून त्यांना प्रवेश नाकारला तर त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आमच्यावर होतो. अशा स्थितीत कसे काम करावे, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
तोपर्यंत आमच्या मुलांना सांभाळा
काही नागरिक आपल्या मुलांना घेऊन उद्यानात येतात. मुलांना प्रवेश नसल्याचे सांगितल्यास ते सुरक्षा रक्षकाशी वाद घालतात. “आम्ही उद्यानात फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही आमच्या मुलांना सांभाळा, असेही काहीजण सांगतात. आता उद्यानाची सुरक्षा करायची की मुलांना सांभाळायचे, असा प्रश्न दुसऱ्या एका उद्यानातील सुरक्षा रक्षकाने केला आहे. अनेकदा काही टवाळखोर सुरक्षा रक्षकांना मारहाणही करतात. काही उद्यानांना खासगी सुरक्षा रक्षक असल्याने त्यांना कोणतेही शासकीय संरक्षण नाही.