एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल
पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला एजंटने कार्यालयात शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका चाळीस वर्षीय एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश दादाराव देवकाते (वय 52) यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो एजंट दोन दिवसांपूर्वी देवकाते यांच्या कार्यालयात सायंकाळी शिरला. त्याने देवकाते यांच्या पुढ्यातील टेबलवर कागदपत्रे फेकली. देवकाते यांच्या कार्यालयातील दरवाजा आतून बंद करून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर कार्यालयीन लिपिकांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याने लिपिकांना तसेच देवकाते यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो पसार झाला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.