आरटीओंचे “एमएच-11, हॉर्न विसरा’ अभियान

संजय राऊत : बुधवारी विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

सातारा  – वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण होऊन आपल्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्या संकल्पनेतून “एमएच-11, हॉर्न विसरा’ अभियान राबवले जात आहे. या अभियानात बुधवार, दि. 11 रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. “सातारकरांनी हॉर्न वाजवायचा नाही’ या प्रथेची सुरुवात त्या दिवशी केली जाणार आहे. या मोहिमेत शाळा व महाविद्यालयांचा सहभाग वाढवला जाणार असून मोहिमेचा भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात बावीसशे विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना “हॉर्न नॉट ओके प्लीज’ हे स्टीकर वाटण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

“एमएच-11, हॉर्न विसरा’ या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य, महसूल यंत्रणा, नगरपालिका, महाविद्यालयांमधील आरएसपी व एनसीसी जेसीओंची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी पुण्यात तत्कालीन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांच्या सहकार्याने “नो हॉर्न प्लीज’ ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

विद्यार्थी पालकांकडून “मी हॉर्न वाजवणार नाही’, अशा आशयाची पत्र लिहून घेणार असून ही पत्रे परिवहन कार्यालयात जमा केली जाणार आहेत. दि. 11 रोजी साताऱ्यात विद्यार्थी प्रभात फेरी काढणार असून “मी कधीही हॉर्न वाजवणार नाही’, अशी शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपवादात्मक परिस्थितीतच हॉर्न वाजवण्याची मुभा आहे. कर्कश हॉर्नचा परिणाम मानवी शरीर, मेंदू, रक्‍ताची पातळी, रक्‍तदाब व कोलेस्ट्रॉलवर आपोआप होतो. त्यामुळे “सातारा सिटी, सायलेंट सिटी’ प्रचलित करण्याचा मानस आहे. 11 ऑक्‍टोबर व 11 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात पुन्हा हॉर्नविरोधी जनजागरण अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमांर्तगत ट्रकचालक, रिक्षाचालक, खाजगी चालक, नगरपालिका परिवहन विभाग यांची कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)