गिरजवडे प्रकल्पातील पाण्याचे पहिल्यांदाच पूजन

आ. नाईक यांच्या प्रयत्नांना यश; काम बंद केले म्हणणाऱ्या विरोधकांना चपराक

शिराळा – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील रद्द झालेला हा मध्यम प्रकल्प आम्ही गिरजवडे या ठिकाणी आणला. त्याची यशस्वी उभारणी करून या पावसाळ्यात त्यामध्ये पाणी आडवले. या मध्यम प्रकल्प तलावातील पाणी पूजन झाल्याने आम्ही समाधानी आहोत. आम्ही काम बंद पाडले, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ही मोठी चपराक असल्याचे मत आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.

गिरजवडे, ता. शिराळा येथील मध्यम प्रकल्पातील पाणी पूजन व येथील भक्त निवास सभा मंडप व इतर कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते रणधीर नाईक, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. नाईक म्हणाले, गिरजवडे व परिसराला पाणी मिळावे, म्हणून 1995 पासून माझा प्रयत्न होता. त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे. अनेक मंडळी याचे श्रेय घेत आहेत. मात्र यासाठी शासकीय पातळीवर कसे आणि किती प्रयत्न करावे लागले आणि आम्ही ते कसे केले हे इथल्या प्रामाणिक जनतेला माहीत आहे.

ज्यांना या प्रकल्पासाठी काही करता आले नाही. त्यांनी आम्ही काम बंद पाडले असे भासवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले आहेत. या परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली निघून येथील जनतेचा पाण्याचा वनवास आता संपला आहे. संपादित केलेल्या जमिनीला आम्ही शासनाकडून भरघोस मोबदला शेतकऱ्यांना देऊ केला आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणी पूजन करण्यात आले. महिलांनी येथील पाणी कलशामध्ये घेऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात उत्तर विभागाचे दैवत ज्योतिर्लिंग मंदिराकडे मिरवणुकीने नेले.

आ. शिवाजीराव नाईक व इतर महिला मान्यवरांच्या हस्ते ज्योतिर्लिंग देवास या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक डी. आर. मुळीक यांनी केले. शरद गुरव, प्रकाश पाटील, सुखदेव पाटील, रणधीर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश गिरी यांनी सूत्र संचालन केले. आभार आनंदराव शेळके यांनी आभार मानले. यावेळी गजानन घोडे, सुकुमार पाटील, जयकर भोसले, विलास गुरव, शरद गुरव, डी. आर. मुळीक, सौ. देवयानी नाईक, सारिका पाटील, ज्योती गुरव, वैभवी कुलकर्णी, कुंदा पाटील, इंदुबाई पाटील, नंदा पाटील, विजय महाडिक, भगवान मस्के, तानाजी घोडे, प्रदीप कदम, मोहन मुळीक, आनंदराव शेळके, बाजीराव पाटील, आनंदा मोंडे, हौसेराव मुळीक, किसन मुळीक, संभाजी पाटील, सुनील शेळके, बाजीराव झेंडे, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, गणेश देसाई, संभाजी यादव, शासकीय अधिकारी, ठेकेदार या मान्यवरांच्यासह शेकडो ग्रामस्थ, महिला, पुरुष, अबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)