पिंपरी- आरटीईअंतर्गत बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता आरटीई प्रवेशासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायम विनाअनुदानित शाळांतील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. यंदा सोडत 5 एप्रिलला काढण्यात आली. मुळात एप्रिलमध्ये उशिरा लॉटरी काढण्यात आली. तर, 13 एप्रिलपासून बालकांचा प्रवेश निश्चित करण्यास सुरवात केली. त्यानुसार 5 मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच आरटीईचे पोर्टल बंद पडल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत होत्या. परिणामी आरटीई अंतर्गत प्रवेश घेता यावेत, यासाठी शिक्षण विभागाने 8 मे पर्यंत मुदत वाढवून दिली. पुन्हा 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अनेक बालकांचे प्रवेश अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मुदतीतील कागदपत्रे ग्राह्य धरावीत
या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चिती करण्यासाठी 22 मे पर्यंतच्या वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत. तदनंतर या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.