वाठार स्टेशन – छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा एक हजार कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांनी पिंपोडे बुद्रूक येथील बॅंकेच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली. उद्या रविवार, दि.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्याने, जयंतीचे औचित्य साधत आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे लेंभे यांनी सांगितले.
या निमित्ताने विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये दुपारी तीन वाजता संभाजी महाराजांची प्रतिमा व ज्योतीची गावातून मिरवणूक काढणार आहे. तसेच उल्लेखनीय काम केलेल्या सेवकांचा सत्कार समारंभ, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बॅंकिंग क्षेत्रातील मान्यवर काका कोयटे व जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपोडे बुद्रूक येथील संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये केले आहे. सावकारी पाशातून सर्वसामान्य जनतेला सोडविण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक सारख्या दुष्काळी भागात 33 वर्षापूर्वी फक्त 40 हजारांच्या भागभांडवलावर सुरु केलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने सर्वांचा विश्वास संपादन करीत आज एक हजार कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.
ग्रामीण भागात स्थापन होऊन शहरांकडे झेपावलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची स्थापना 1989 मध्ये झाली. अभ्यासू संचालक मंडळ व निष्ठावान सेवक,संस्थेवर प्रेम असणारे सल्लागार यांच्या माध्यमातून संस्थेने गरूडभरारी घेतली आहे.
आठ विभागीय कार्यालये व 52 शाखांमधून संपूर्ण संगणकीय कारभार करणाऱ्या संस्थेची 30 एप्रिल 2023 अखेर सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे – भागभांडवल- 26 कोटी 83 लाख, सभासद संख्या- 69 हजार 676, सेवक संख्या – 250, ठेवी – 570 कोटी 74 लाख, कर्जवाटप – 431 कोटी 79 लाख, गुंतवणूक – 176 कोटी 12 लाख, खेळते भांडवल – 649 कोटी 51 लाख, संमिश्र व्यवसाय 1002 कोटी 49 लाख, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड एवढे विस्तारीत कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेने बॅंकेप्रमाणेच सीबीएस प्रणाली राबवून स्वमालकीच्या डाटा सेंटरद्वारे सर्व शाखांमधून आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सुविधा सुरू केल्या आहेत.
संस्थेने स्वतःच्या मोबाईल ऍपमार्फत ग्राहकांना मोबाईल बॅंकींग सुविधा, क्यूआर कोड व यपीआय कोड सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विविध आकर्षक ठेव योजना व विविध कर्ज योजना, एनपीएची पूर्ण तरतूद, स्टॅंडर्ड सीडी रेशो, सुरक्षित ठेवी, सुरक्षित गुंतवणूक, सुरक्षित कर्जे, सर्वांसाठी विमा योजना आदी वैशिष्ट्ये, ग्राहकसेवेचा दर्जा पाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. ही सभासदांचे दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या आनंद मेळाव्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे तसेच संचालक मंडळाने केले आहे.