पिंपरी – तळेगाव नगरपरिषदेच्या प्रांगणात शुक्रवारी जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांचा क्रूरपणे खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण मावळ परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आवारे यांचा खून करणाऱ्या पाच आरोपींना पकडले असून न्यायालयाने त्यापैकी चार जणांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत किशोर आवारे यांची आई सुलोचना गंगाराम आवारे (वय 69, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाम निगडकर, सुनील शेळके, सुधाकर शेळके, सुधाकर गराडे सर्व जण रा. तळेगाव दाभाडे) व इतर तीन अनोळखी इसम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रविण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघेही रा. नाणे, मावळ), संदीप विठ्ठल मोरे उर्फ नन्या (रा. आकुर्डी) आणि सीनू उर्फ श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) यांना अटक केली आहे.
किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक काम करत होते. ते राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच खटका उडत होता. गेल्या सहा महिन्यांपासून किशोर हे आमदार सुनील यांचा भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून जीवाला धोका असल्याबाबत सांगत होते. आमचे वाहनचालक प्रवीण ओव्हाळ यांना सुधाकर शेळके व त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती.
किशोर हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असत. ही गोष्टी सुनील शेळके व सुधाकर शेळके यांना आवडत नव्हती. सुनील यांचे संतोष सोबत राजकीय वितुष्ट होते. किशोर हे संतोषला नेहमी मदत करत असे. त्यामुळे सुनील शुळके, सुधाकर शेळके हे किशोरवर चिडून असायचे. किशोर यांनी स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना दोन वर्षांपासून राजकीय विरोध केला आहे. त्यांच्या चुकीच्या कामाविरोधात वेळोवेळी निदर्शने केली आहेत. किशोर यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होऊन सुनील शेळके यांच्या राजकीय वर्चस्वला धोका निर्माण झाला होता. माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल, हे किशोरने आपल्याला सांगितले होते, असेही सुलोचना आवारे यांनी फिर्यादी जबाबात म्हटले आहे. त्यामुळेच सुनील शेळके व त्यांचा भाऊ सुधाकर शेळके तसेच संदीप गराडे यांनी संगनमत करून, पूर्ववैमनस्यातून बंदूक व कोयत्याच्या सहाय्याने किशोर आवारे यांचा खून केला, अशी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या दिवशीही पोलीस बंदोबस्त
दरम्यान, किशोर आवारेंचे राजकीय वलय पाहता, तसेच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे व त्यांच्या भावाचे नाव खुनाच्या फिर्यादीमध्ये आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तळेगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दुसऱ्या दिवशीदेखील संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभिर्य व राजकीय व्यक्तींची नावे यामध्ये आल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशनला ठाण मांडले. तपासाबाबत पोलीस पथकांना सूचना देत, घडामोडींची ते स्वत: माहिती घेत होते.