अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणूक शांततामय आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व मंचर पोलीस यांच्याकडून रुट मार्च काढण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली. मंचर येथून सकाळी दोन पोलिस जीप सायरन वाजवत आणि चार पिंजरे यासह इंजिनीयरींग कॉलेजमार्गे अवसरी खुर्द गावात आले.
सुमारे शंभर पोलीस आणि आधिकारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हजर झाले. लोकसभेच्या निवडणुकीची धावपळ, रमजान ईद तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव ,सणांचे अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने अवसरी खुर्दमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून रुट मार्च काढण्यात आला.
यात मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फ़ुगे, एपीआय बालाजी कांबळे, पी एस आय यशवंत यादव तसेच १८ पोलीस अंमलदार, सहा होमगार्ड व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे पोलीस निरीक्षक प्रशांत मेश्रम व दोन अधिकारी आणि ६५ जवान सहभागी झाले होते.
येत्या निवडणुकीत आणि यात्रा तसेच ईद व इतर सन शांततेत साजरे करावेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणत्याही नागरिकांकडून होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.