पळसदेव, (वार्ताहर) – ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः उद्योजक बनणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतः ठाम आत्मविश्वासाने ध्येय निश्चित करून अगदी कमी भांडवलामध्ये सुरू होणार्या व्यवसायाकडे लक्ष दिल्यास महिला सहज उद्योजक बनू शकतात. महिला कमवत्या झाल्यानंतर त्यांना समाजात एक वेगळे स्थान निर्माण होत.
त्यामुळे महिलांनी व्यवसाय करावेत. हे व्यवसाय सुरु करण्यासाठी संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ तुमच्या पाठीशी आहे. आपण महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे मत लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
इंदापूर येथील संत रोहिदासनगर येथे चर्मकार, ढोर, होलार, मोची समाजातील नागरिकासाठी संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम) व महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण संस्था (एमसीईडी, पुणे) यांच्या वतीने लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धमज्योती गजभिये व एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्याचे तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना अमोल शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे यांनी लिडकॉमच्या महिला समृद्धी, मुदत कर्ज, बीज भांडवल, शैक्षणिक कर्ज, महिला अधिकारिता, गटई स्टोल, मोफत प्रशिक्षण आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले व या योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र याची माहिती दिली.
शिंदे म्हणाले की, महामंडळाच्या वतीने संत रोहिदास सुवर्ण जयंती उद्योजकता विकास प्रशिक्षण योजने अंतर्गत पुढील 3 वर्षांत 25 हजार चर्मकार, ढोर, होलार, मोची समाजातील नागरिकांना प्रशिक्षण देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके, कार्यक्रम अधिकारी रामदास पवार, माधवी सोनवीस, नवनाथ शिंदे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.