“75 टक्के हिंदू, 20 टक्के मुस्लिम…” ; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा ‘नंबर गेम’

Varanasi Lok Sabha Number Game । पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पीएम मोदी तिसऱ्यांदा या जागेवरून उमेदवारी दाखल करत आहेत. त्यातच भाजपने हा दावा केलाय की यावेळी ते मागील निवडणुकीतील विजयापेक्षाही मोठा विजय नोंदवतील. अनेक समीकरणे आणि त्यांची संख्या हे राजकीय दावे आणि रणनीती या मागील मुख्य कारण आणि पाया आहेत. पीएम मोदींच्या नामांकनाव्यतिरिक्त, वाराणसीचा नंबर गेम काय म्हणतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याठिकाणचा कोणता घटक निवडणूक निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका नेहमी बजावतो? हे जाणून घेऊया…
पहिल्या सीटचे समीकरण Varanasi Lok Sabha Number Game ।
भारताची धार्मिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी वाराणसी लोकसभेत एकूण पाच विधानसभा जागा आहे. वाराणसी दक्षिण शहर, वाराणसी उत्तर, वाराणसी कँट, रोहनिया आणि सेवापुरी या विधानसभांचा समावेश आहे. 1957 पासून ही जागा भाजपने सात वेळा जिंकली आहे तर काँग्रेसने सहा वेळा ही जागा जिंकली. 1991 पासून फक्त एकदा 2003 मध्ये ही जागा भाजपच्या हातून निसटून काँग्रेसकडे गेली होती. 2009 पासून या जागेवर भाजपचे उमेदवार सातत्याने विजयी होत असून आता हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.
वाराणसीच्या एकूण मतदारांबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी एकूण 19.62 लाख मतदार आहेत, जे पंतप्रधान मोदींचे भवितव्य ठरवणार आहेत. 19 लाख 62 हजार 948 मतदारांपैकी 10 लाख 65 हजार 485 पुरुष तर 8 लाख 97 हजार 328 महिला आहेत. वाराणसीमध्ये 135 तृतीयपंथी मतदार आहेत. 52 हजार 174 मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
75 टक्के हिंदू आणि 20 टक्के मुस्लिम
वाराणसी लोकसभा मतदारसंघात एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. तर 20 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. उर्वरित 5 टक्के लोकसंख्येमध्ये इतर धर्माच्या लोकांचा समावेश आहे. या भागातील 65 टक्के लोकसंख्या शहरी भागात तर 35 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. एकूण लोकसंख्येपैकी 10.01 टक्के आदिवासी आणि 0.7 टक्के दलित वर्गातील आहे.
वाराणसीवर ओबीसी घटकाचा प्रभाव Varanasi Lok Sabha Number Game ।
कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरण हा मोठा घटक असतो. वाराणसी मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर, येथे सर्वाधिक म्हणजे सुमारे २ लाख मतदार कुर्मी समाजाचे आहेत. या समाजाचा सर्वाधिक प्रभाव रोहनिया आणि सेवापुरी भागात आहे. या जागेवर 2 लाख वैश्य मतदारही आहेत, ज्यांचा थेट परिणाम निकालावर होत आहे. कुर्मी आणि वैश्य समाजानंतर वाराणसीमध्ये ब्राह्मण आणि भूमिहार मतदारांचीही चांगली टक्केवारी आहे. यादव आणि मुस्लिम समाजाच्या मतांमध्येही या जागेवर निवडणूक विजयाचा झेंडा फडकवण्याची ताकद आहे. या जागेवर यादव समाजाची एक लाख मते आहेत. या जागेवर यादव मतदारांव्यतिरिक्त एकूण तीन लाख मतदार ओबीसी समाजाचे आहेत.





