पर्यटकांसाठी ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
नारायण सातपुते
वाठार – रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीपात्रातील गोलाकार दिसणारा खडक पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधत असून या खडकामुळे रेठरे बुद्रूकाच्या कृष्णा काठचे निसर्ग सौंदर्य खुलून दिसत आहे. मौलाना खडक या नावाने प्रसिद्ध असलेल्या नदीपात्रातील या खडकाचा पुलावरून अतिशय सुंदर असा देखवा दिसत असल्यामुळे हा खडक पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, रेठरे बुद्रुक ता. कराड हे गाव आर्थिक राजकी व सामाजिक पटलावर बहुचर्चित आहे, तसेच येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामुळे हे गाव सतत प्रसिद्धीच्या झोतात असते, कराड पासून वाठारमार्गे रेठरे बुद्रुक हे गाव अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे, येथून कृष्णा कारखान्याकडे जाताना रेठरे खुर्दहुन पुढे रेठरे बुद्रूकाच्या नदीवरील पूलावरती पोहोचले की रेठऱ्याच्या कृष्णाकाठवरील महादेव मंदिर नजरेस पडते, तसेच पुलावरून पुढे जात असताना नदीपात्रातील पाण्यामध्ये असणारा गोलाकार खडक पहिला की मन प्रसन्न होते.
रेठऱ्याच्या कृष्णाकाठचा हा देखावा पाहिला की जणू एखाद्या पर्यटनस्थळीच आल्याचा आभास होतो, मनाला भुरळ घालणारा हा नदीपात्रातील सभोवताली पाणी व मध्यभागी गोलाकार दिसणारा हा खडक, पुलावरून प्रवास करनाऱ्याला आकर्षित करतो, नदीपात्रातील या खडकाचे नाव मौलाना खडक असे आहे, गावातील स्थानिकांच्या भावना या खडकाशी जोडल्या गेल्या आहेत, या खडकाविषयी जुने जाणकारांनची विविध मतमतांतरे आहेत, देवाचे रूप म्हणून काही लोक येथे पूजाअर्चा करतात, फार वर्षांपूर्वी पावसाळ्यात हा मौलाना खडक म्हणजे एक पुराच्या पाणीपातळी वाढ दर्शविणारा दिशादर्शक होता, मौलाना खडक पुराच्या पाण्यात बुडाला की पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली असल्याची सूचना गावकऱ्यांना मिळायची. काही महिन्यांपूर्वी नदी पात्रात मागरीचा वावर असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. तेव्हापासून नदीपात्रात क्वचितच लोक जात असल्याचे पाहावयास मिळते, एकंदरीत रेठरे बुद्रूकच्या नदीपात्रातील मौलाना खडक लक्षवेधी ठरला आहे.
फार वर्षांपूर्वी कृष्णा नदीपात्रातील हा मौलाना खडक म्हणजे एकप्रकारचा धोक्याची सूचनादर्शक होता, पावसाळ्यात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असताना हा मौलाना खडक पाण्याखाली गेला की पुराचा धोका ओळखून शेतकरी नदीकाठच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारी काढून घ्यायचे.
धनंजय मोहिते , रेठरे बुद्रुक, ता. कराड