सातारा – परकीय गुंतवणुकीचे 125 कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका उद्योजकाची तब्बल 80 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बंगळुरू येथील एका व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्रसन्न आनंदराव देशमुख (रा. कामाठीपुरा पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. श्रीनिवास सत्यनारायण मधीमधी (रा. बंगळुरू), अजित गायकवाड (रा. वेळे, ता. वाई, सध्या रा. ठाणे) व बिलाल (पूर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रसन्न आनंदराव देशमुख (रा. कामाठीपुरा पेठ, सातारा) यांची स्वत:ची कंपनी आहे. मुंबई येथे फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कंपनीचे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी तेथे अजित गायकवाड यांची ओळख झाली.
दरम्यान, गायकवाड याने बंगळुरू येथील श्रीनिवासची ओळख करून दिली. ही ओळख करून देताना श्रीनिवास हे परकीय गुंतवणुकीचे आर्थिक कर्ज देण्याच्या क्षेत्रात काम करतात, असे सांगितले. त्यामुळे देशमुख यांचा विश्वास बसला. त्यानंतर देशमुख यांना संशयितांनी ईमेल आयडी दिला व त्यावर देशमुख यांच्या कंपनीची कागदपत्रे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधितांनी खोटी कागदपत्रे तयार करून प्रसन्न देशमुख यांच्याकडून 80 लाख रुपये घेतले. ही रक्कम घेताना संबंधितांनी हसीना एन्टरप्राईजेस यांच्या ऍक्सिस बॅंकेच्या कागदपत्रांसाठी पैसे लागणार आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांनी संबंधितांच्या अकाऊंटवर 80 लाख रुपये पाठविले. त्यानंतर संबंधितांनी देशमुख यांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.