जगभरातील हेरगिरीच्या इतिहासात चीनने एक नवा अध्याय लिहिला आहे. तो म्हणजे जगातील 53 हून अधिक देशांमध्ये अवैधरित्या थेट 100 पेक्षा जास्त पोलीस ठाणी चीनने स्थापन केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जागतिक दर्जाचे महत्त्वाचे शहर असणाऱ्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये चीनचे बेकायदेशीरपणाने सुरू असलेली पोलीस चौकी आढळली आहे. एफबीआयने याबाबतचा शोध लावल्यानंतर संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. साम्राज्यवादाच्या आणि विस्तारवादाच्या लालसेने पछाडलेल्या चीनची ही नवी रणनीती नेमकी काय आहे, याचा घेतलेला आढावा.
कुठल्याही स्वतंत्र देशात दुसऱ्या देशाची पोलीस ठाणी असू शकत नाहीत. कारण, तसे असणे सदर राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यासारखे होते; परंतु चीनने मोठ्या चतुराईने जगातील 100 देशांमध्ये आपली पोलीस ठाणे उभी केली आहेत. त्यामुळे जगाच्या भोवती आपल्या वर्चस्वाचा फास आवळला आहे. नुकतेच अमेरिकेच्या भरगच्च वस्ती असलेल्या, मोठ्या शहराचे हृदय असलेल्या मॅनहिटन या परिसरातील चायना टाउन या चिनी लोकसंख्याबहुल भागात एका इमारतीमध्ये दोन चिनी पोलीस ठाणी कार्यरत असल्याचा शोध एफबीआय या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने लावला.
मागील ऑक्टोबर महिन्यापासून तेथे सोशल मीडियावर चिनी समूह सक्रिय होता. हा समूह चीनच्या बाजूने तरफदारी करत असे. त्यानंतर आता या पोलीस ठाण्यांचा शोध लागला. त्यामध्ये दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली. तसेच 13 जणांची कायदेशीरपणे चौकशी चालू आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याचा रितसर उलगडा होईल. फेडरल ब्युरो ऑफ इनव्हिस्टीगेशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे चीनचे हे कृत्य धाडसी, आव्हानात्मक आणि तेवढेच धक्कादायक आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात चीन हे धाडस करू शकतो, तर जगातील कुठल्याही देशात पोलीस ठाणी उभारण्याचे धाडस चीन करू शकेल याबद्दल कोणालाही शंका वाटणार नाही; परंतु चीनचे हे उपद्व्याप खरोखरच अमेरिकेच्या प्रभावशाली अस्तित्वाला आव्हान देणारे आहेत.
आणखी शंभर पोलीस चौक्या
या संदर्भात जगातील काही वृत्त संस्थांनी केलेल्या शोध वार्तांकनामुळे चीनचे पितळ उघडे पडले आहे. विशेषत: चीनने एक ना दोन जगातील विविध देशांमध्ये 100 पेक्षा अधिक पोलीस चौक्या उभारल्या असल्याचे आता उघडकीस आले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांतील प्रजासत्ताक सरकारांची झोप उडाली आहे.
चिनी ड्रॅगनची करामत
चिनी ड्रॅगन झोपी गेला आहे. तो जागा झाला तर सारे जग हालवून टाकेल असे अफूच्या युद्धकाळात म्हटले जात असे. अखेर 1949 मध्ये ड्रॅगनची झोप संपली माओ त्सुंग याने चीनला आधुनिक बनवले. 1975 पर्यंत चीनवर माओचा पगडा होता. आता जिंगपिंग यांनी चीनला महासत्ता बनवले आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यापासून चीनला पहिल्या क्रमांकावर जाण्याची स्वप्ने पडत आहेत. त्यासाठी चीन “वन बेल्ट वन रोड’ अशा अनेक वल्गना करत आहे. चीनला स्वतंत्र तैवानचे अस्तित्व नको आहे; परंतु आता पोलीस चौक्यांचे गौडबंगाल हे मात्र आश्चर्यकारक आहे. चीनने यासाठी काही यजमान राष्ट्रांची निवड केली आहे. दुबळे, कमजोर आणि ज्याला मदतीची गरज आहे अशा देशांची निवड करून या यजमान राष्ट्रांच्या मदतीने चीनने जगात 100 हून अधिक पोलीस चौक्या प्रस्थापित केल्या आहेत, असे अलीकडे काही शोधक संस्थांनी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालांनी जगातील अनेक अभ्यासकांची झोप उडवून दिली आहे. विशेषत: 22 मार्च 2021 रोजी प्रकाशित झालेल्या काही चित्रांमधून चीनने आपल्या दूतावासाच्या हद्दीत काही पोलीस ठाणी उभी केली होती; परंतु यापुढे जाऊन अज्ञात आणि माहीत नसलेल्या ठिकाणीसुद्धा चीनने हे प्रयोग केले. खुद्द अमेरिकेला त्याची कल्पना नसतानाही चीनची ही पोलीस ठाणी कार्यरत होती. याचा हेतू तेथील चिनी नागरिकांवर नजर ठेवणे हा आहे असे सांगितले जाते. चिनी नागरिक काही राष्ट्रविरोधी कारवाई करत असतील आणि त्या कारवाईमुळे चीनला काही धोका पोहोचत असेल तर या नागरिकांना वठवणीवर आणणे आणि त्यांना परत चीनमध्ये पाठवणे हा प्रामुख्याने त्यामागचा हेतू आहे. अलीकडे अनेक लोक चीनच्या हुकूमशाहीला कंटाळून त्याविरोधात लोकशाही चळवळ करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. त्यांना वेसण घालणे आणि अद्दल घडवणे या हेतूने या पोलीस ठाण्यांची योजना केली आहे, असा चीनचा दावा आहे.
मद्रीस येथील संघटनेने मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या चीनच्या या प्रयत्नाचा एक अभ्यास केला आणि या गटाने असे स्पष्टपणे सांगितले की, अशा 54 पोलीस स्थानकांचे अस्तित्व उघड करण्यात आले आहे. विशेषत: 48 अतिरिक्त पोलीस ठाणी चीन चालवत असल्याचे पुरावे या संघटनेच्या हाती आले आहेत. ही ठाणी चालतात कशी? त्यांचे काम कसे चालते? याविषयी अनेकांना कुतूहल वाटते. या चिनी ठाण्यांचा हेतू परदेशांमध्ये गस्त घालणे आणि चीन विरुद्ध बंड करणाऱ्या लोकांचे मन वळवून त्यांना परत आपल्या देशात आणले आहे. चीनचे हे नेटवर्क कसे चालते? आणि याची कार्य रचना कशी आहे याबद्दलसुद्धा अनेकांना कुतूहल आहे.
विशेषत: चीनने अलीकडे इटलीच्या सहकार्याने युरोपात प्रवेश मिळवला आणि इटलीमध्ये संयुक्त करार करून तेथे प्रथम संयुक्त पोलीस गस्त घालण्याचा प्रयत्न केला. या गस्तीबरोबरच काही ठाणी इटालीमध्ये रोम, मिला इत्यादी शहरांमध्ये स्थापन केली आहेत. करोना काळामध्ये इटलीने चीनचा उपसर्ग सहन केला. चीनमुळे तेथे करोना वाढला; परंतु तरीदेखील इटलीच्या नेत्यांना अजूनही जाग येत नाही आणि ते आता संयुक्त पोलीस गस्तीच्या नावाखाली चीनच्या कुरापतींना बळी पडले आहेत. चीनने इटलीमध्ये सरकारच्या सहकार्याने अलीकडेच पोलीस ठाणे सुरू केले आहे.
पोलीस ठाण्यांची कार्यपद्धती
ही पोलीस ठाणी कोण चालवतात? कशा पद्धतीने चालवतात? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. स्टेट गार्ड डिफेंडर या नावाने ही योजना आखण्यात आली आहे. अधिकृत चिनी दस्तावेजांमध्ये कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या पुराव्यासाठी प्रयत्न करताना ही ठाणी चिनी नागरिकांवर नजर ठेवतात. चिनी नागरिकांवर नजर ठेवताना ते त्या देशातील इतर गोपनीय माहितीसुद्धा मिळवत असावेत आणि ही माहिती चीनला पुरवत असावेत. आता सध्या 53 देशांमध्ये चीनची सक्रिय पोलीस ठाणी कार्यरत आहेत. जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून ही पोलीस ठाणी कार्यरत असून त्याद्वारे गस्त घालण्याचे आणि गोपनीय माहिती मिळविण्याचे काम सर्रासपणे चालू असते. पण याबाबत बीजिंगने आपण असे काही करत नाही असे सांगितले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये याबद्दल जागतिक वृत्तसंस्थांना सांगितले की आम्हाला आशा आहे की संबंधित पक्ष तणाव निर्माण करण्यासाठी याचा प्रचार करत आहे आणि चीनला बदनाम करण्यासाठी हे निमित्त म्हणून वापरले जात आहे. चीन अशा प्रकारच्या प्रयत्नांना नकार देत असला तरी त्यामागचे षड्यंत्र काही लपून राहत नाही.
जगात चीनची जी पोलीस ठाणी आहेत त्यांच्या कार्यपद्धतीचे चीन नूतनीकरण करून त्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सत्तेचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कोविड 19 च्या काळात चीनने कितीतरी उपद्व्याप केले. त्याचा चीनला फटकाही बसला; परंतु आता कागदपत्रांचे नूतनीकरण करून आपल्यावर झालेले आरोप कसे दूर करता येतील यासाठी चीन प्रयत्न करत आहे. स्टेट गार्ड डिफेंडरच्या मूळ आरोपाबद्दल चीनने मोठा सावध पवित्रा घेतला आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात असे प्रतिपादन केले की ही पोलीस ठाणी स्वयंसेवकाद्वारे कार्यरत आहेत. तथापि, संस्थेच्या ताज्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी तपासलेल्या एका पोलीस नेटवर्कने 21 देशांसाठी 135 लोकांना कामावर घेतले होते. याचा अर्थ असा की चीनची यंत्रणा सुसज्ज असून ती सुसंघटित आहे आणि मोठ्या नियोजित पद्धतीने चीनने हे जगावर जाळे टाकले आहे.
चीनच्या या सर्व प्रयत्नाचा आढावा घेतला असता असे दिसते की, कधी यजमान राष्ट्राची संमती घेऊन तर कधी संमतीविना गुप्तपणे आपल्या कारवाया चीन त्यांच्यावर लादतो आणि परदेशातील नागरिकांवर नजर ठेवण्याची कामगिरी करत असतो. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीचा विचार करता चीनचे हे प्रयत्न अयोग्य असले तरी आपण करतो आहोत ते बरोबरच आहे, असे चीनला वाटते. परदेशात राहणाऱ्या चिनी लोकांचा राजकीय छळ करण्यासाठी आणि हेरगिरीसाठी या ठाण्यांचा उपयोग चीन करत आहे असे लक्षात येते. चीनने पोलीस ठाणी उभी करून त्या त्या राष्ट्रांची माहिती मिळवून तेथे आपले आर्थिक साम्राज्य आणि वसाहत उभी करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून हे तंत्र अवलंबले आहे. त्यामुळे जगातील राष्ट्रांनी वेळीच सावध होऊन चिनी पोलीस ठाण्याचे हे गौडबंगाल उघड केले पाहिजे.
रुझवेल्टनीती
“गोड बोला आणि पाठीमागे मोठा दंडुका वापरा’ असे धोरण अमेरिकेने 1900 ते 2000 या काळात थिओडोर रुझवेल्ट यांनी आखले होते. तेव्हा त्यांना जगाच्या राजकारणातील अनभिषिक्त फौजदार असे म्हटले जात असे. अमेरिकेचे हितसंबंध दुखवले जातील आणि लोकशाही संकटात येईल त्यावेळी अमेरिका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका घेऊन दंडुका चालवणार असा याचा अर्थ होता. रुझवेल्टच्या या सिद्धांताचा प्रभाव अमेरिकेने 1900 ते 2000 या काळात दाखवला. सध्याही अमेरिका दाखवत आहे; परंतु महासत्ता अमेरिकेला चीनने कडवे आव्हान दिले आणि आता हा पोलिसीखाक्या अमेरिकाच दाखवू शकते असे नाही तर चीनसुद्धा दाखवू शकतो, हे चीनने दाखवून दिले आहे.
– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर