निवडणूक आयोगापुढे मांडली भूमिका
नवी दिल्ली -राष्ट्रीय पक्ष हा दर्जा धोक्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) सोमवारी निवडणूक आयोगापुढे भूमिका मांडली. संबंधित पक्षांनी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाचे समर्थन केले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून दर्जाबाबतचा निर्णय घेतला जाऊ नये. आगामी विधानसभा निवडणुकांत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळावी, असे साकडे त्या पक्षांनी घातले.
लोकसभा निवडणुकीत कामगिरीत घसरण झाल्याने राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकप या पक्षांना निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्याद्वारे त्या पक्षांना राष्ट्रीय दर्जा रद्द का केला जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना संबंधित पक्षांनी केवळ लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे दर्जा ठरवला जाऊ नये, असे म्हटले. त्यानंतर त्या पक्षांना प्रतिनिधी पाठवून भूमिका मांडण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली. राष्ट्रीय राजकारणात आम्ही महत्वाची भूमिका निभावली आहे. दर्जा निश्चित करण्यासाठी वापरण्यात येत असलेले निकष योग्य नाहीत, असे त्या पक्षांनी म्हटले.
निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादीची भूमिका त्या पक्षाचे नेते माजिद मेमन यांनी मांडली. एका अपयशामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला जाऊ शकत नाही. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चांगली कामगिरी करून दाखवेल. त्यामुळे आणखी संधी मिळण्यास पक्ष पात्र आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. सध्या आठ राजकीय पक्षांना राष्ट्रीय दर्जा आहे. त्यामध्ये भाजप, कॉंग्रेस, बसप, माकप आणि मेघालयच्या नॅशनल पीपल्स पार्टीचाही समावेश आहे.