विविधा: डॉ. विश्राम रामजी घोले

माधव विद्वांस

“महात्मा फुले’ यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे आज पुण्यस्मरण. ऐतिहासिक परंपरा असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म 1833 मध्ये वेंगुर्ला येथे झाला. डॉ. विश्राम घोले हे गुहाघरजवळील अंजनवेलचे किल्लेदार गोपाळराव घोले यांचे पणतू होते. त्यांचे नावावरूनच “गोपाळगड’ हे नाव पडले. ते 1744 सुमारास किल्लेदार होते. 1818 मधे त्यांचे चिरंजीव संभाजी घोले यांना इंग्रजांनी अटक केली. काही दिवसानंतर ते तुरुंगातून निसटले व जंजिरा येथे राहण्यास गेले. तेथे त्यांना मुलगा झाला त्याचे रामजी ठेवण्यात आले.

रामजी घोले पुढे इंग्रज पलटणीत भरती झाले व पुढे सुभेदारही झाले. ते वेंगुर्ले येथे असताना त्यांना मुलगा झाला त्याचे नाव विश्राम ठेवण्यात आले. त्यांच्या जन्मतारखेची नोंद नाही. रामजी यांची बदली सिंधला झाली. त्यामुळे विश्राम यांना मामाकडे भिवंडीजवळील टिटवे येथे पाठविले. कालांतराने ते वडिलांच्या मामाकडे दापोली येथे आले व मामांनी विश्रामजींना शाळेत घातले.

दरम्यान, त्यांचे वडील पुणे येथे बदलून आले व त्यांनी विश्रामजींना पुणे येथे आणले. तेथे ते रेव्हरंड मिचेल यांच्या इंग्रजी शाळेत शिकू लागले. तेथे अण्णासाहेब सहस्रबुद्धे व वामनराव परांजपे यांच्यासारखे सुधारणावादी शिक्षक होते व त्यामुळे त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा प्रभाव पडला. 0दरम्यान, वडिलांची बदली मुंबईला झाली व तेही मुंबईला गेले. मुंबईत त्यांचे शिक्षण सुरू असतानाच ते सेकंड ग्रेड अप्रेन्टिस म्हणून 1852 मध्ये ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधे रुजू झाले.

वर्षभरातच ते वडिलांच्या पलटणीत त्याच पदावर हजर झाले. दरम्यान, त्यांची बदली कराचीला झाली. कराची येथे त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने पदोन्नती मिळाली व त्यांची बदली मुंबई येथे करण्यात आली. तेथे त्यांचे वैद्यकीय शिक्षणही सुरू झाले. त्याच वेळी 1857 च्या उठावात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिकांवर उपचार केले.

त्यांना सहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून पदोन्नती देण्यात आली, तसेच त्यांना रावबहाद्दूर ही सन्माननीय उपाधी देण्यात आली. पुण्यात आल्यावर ते सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाले. त्यांचा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री-विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी स्नेह होता.ते महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे काही काळ अध्यक्ष होते. त्यांनी आपली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिला शिक्षण देण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्यांना वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली होती. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी काशीबाईला काचांचा लाडू खायला घातल्यामुळे अंतर्गत रक्‍तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली. यामुळेही खचून न जाता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीलाही (गंगुबाईला) शिक्षित केले व त्यांनी तिचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी करून दिला. त्यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ पुण्यात बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.

1875 सालच्या दुष्काळानंतर डॉ. विश्राम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. शेतीविषयक अनेक अभ्यासपूर्ण प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम घोले यांनी मोठे योगदान दिले होते. अभिवादन.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×