मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संकटाच्या काळामध्ये बाहेर पडून परिस्थिती हाताळत नसल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अशातच आज, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका केली होती.
दरेकर यांच्या या टीकेला आज रोहित पवार यांनी चांगलंच प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणता, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना,’ असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी, ‘जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत आहे.’ असं म्हणत महाविकास आघाडी सरकारचेही कौतुक केले आहे.
तत्पूर्वी, “माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही,” अशी टीका दरेकर यांनी केली होती.