Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले आहे. स्वत: रोहित पवार यांनी ट्वीटद्वारे (एक्स) ही माहिती चाहत्यांना दिली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईलवर सिया राजपूत हे नाव दाखवले जात आहे. सोशल मीडियावर रोहित पवार सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सामाजिक व राजकीय जीवनातील बहुतांश गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत व चाहत्या वर्गापर्यंत पोहोचवत असतात.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया हॅक होण्याची अनेक प्रकरणे समोर आली. यातच आता रोहित पवार यांचेही फेसबूक अकाऊंट हॅक झाले आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.”
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं.
याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.#facebookhack— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 22, 2023
रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचे युरआरएलही बदलण्यात आले असून ते, सिया राजपूत असे दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसतेय. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट करण्यात आल्या आहेत.त्यांच्या अकाऊंटचा प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटो वगळता, एक मेसेजही पोस्ट करण्यात आला आहे. रोहित पवार यांनीच या पेजचे नाव रि-ब्रँडिंगच्या हेतुने बदलले असल्याचाही एक मेसेज पोस्ट करण्यात आला आहे. परंतु रोहित पवारांनी ट्विटरवर हे हॅकरचे काम असल्याचे म्हटले असून रिकव्हरीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले आहे.