बीड : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील फुट पडली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीससोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे.
या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या दोन गटानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर त्यांना कृषिमंत्री पद देखील मिळाले. त्यामुळे आता शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेआधी रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले,’आजची सभा दमदार होणार असून स्थानिकांचा या सभेला चांगला प्रतिसाद मिळेल तसेच बीडमध्ये शरद पवारांसाठी भावनिक बॅनर लावले गेले. पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही, जो नेता 60 वर्षे एक विचार जपून राहिला त्याला अप्रत्यक्षपणे रिटायर व्हा अस सांगता येत आहे. सध्या महाराष्ट्राच राजकारण खालच्या पातळीवर गेले असून फक्त तोडफोडीचे राजकारण सुरु आहे, असं रोहित पवार म्हणाले आहे.