गोंदवले -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता परीक्षेत गोंदवले बुद्रुक येथील रोहित शिवाजीराव कट्टे यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. त्यांच्या यशाने गोंदवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या परीक्षेत यंदाही माणचा डंका वाजला आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लांडेवाडी (जि. पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. बारावी परीक्षेनंतर त्यांनी बी. ई. (सिव्हिल) ही पदवी मिळवली. नागपूर येथून एम. टेक. पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष नोकरी करून दिल्लीतील एका शिक्षण संस्थेत एमपीएससी परीक्षेच्या सरावासाठी शिकवणी लावलीं. 2019 मध्ये या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक अभियंतापद मिळाले. त्यानंतर पुन्हा 2020 च्या एमपीएससी परीक्षेत सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता परीक्षेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल रोहित कट्टे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.