काबूल – अफगाणिस्तानमध्ये अध्यक्षांच्या निवासस्थानावर आज तालिबान्यांनी रॉकेट हल्ला केला. ईद उल अधाच्या निमित्ताने अध्यक्ष अशर्रफ घनी हे जनतेला उद्देशून संदेश देणार होते. त्याच्या काही वेळ आगोदरच हा रॉकेट हल्ला झाला. मात्र या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. हे रॉकेट अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेरील मैदानावर पडले, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मिनवारीस स्टॅनिकझाई यांनी सांगितले.
या रॉकेट हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नाही. मात्र पोलिसांनी त्वरित हा सगळा परिसर पिंजून काढला. या रॉकेट हल्ल्यामुळे जवळच्या रस्त्यावर उभी केलेली एक कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
अध्यक्षांचे निवासस्थान उंच तटबंदी आणि तारेचे कुंपण असलेल्या असलेल्या ग्रीन झोन नावाच्या परिसरात आहे. अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळील रस्ते दूरवरूनच बंद करण्यात आलेले आहेत. अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर हा हल्ला झाला आहे. आता हे सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा हिंसाचार उद्भवण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
तालिबान्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय
गेल्या दोन दिवसांपासून दोहामध्ये तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये पुन्हा चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेच्या वेळी दोन्ही बाजूंकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. तालिबानबरोबर 2017 मध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार 5 हजार तालिबान्यांना सोडल्याचे आपल्याला दुःख होत असल्याचे अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी म्हटले आहे. तालिबान्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून घनी यांनी शेजारील पाकिस्तानवरही चौफेर टीका केली. अफगाणिस्तानच्या सीमा भागात झालेल्या चकमकीनंतर तालिबान्यांना पाकिस्तानातील सामेजवळल चमन भागातील रुग्णालयांमध्ये उपचार मिळाले होते.