श्रीहरिकोटा – इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या रॉकेटने 36 उपग्रहांसह आज मध्यरात्री 12 वाजून 7 मिनीटांनी अवकाशात यशस्वी उड्डाण केले. रविवारी, 24 तासांच्या काउंटडाउनच्या शेवटी येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून 43.5 मीटर उंचीचे हे रॉकेट अंतराळात झेपावले.
या रॉकेटची क्षमता 8 हजार किलो वजनाचे उपग्रह वाहून नेण्याची आहे. त्यामुळे इस्त्रोचे हे रॉकेट सर्वात वजनदार रॉकेट म्हणून संबोधले जाते. या एलव्हीएम 3 रॉकेटद्वारे आज 5796 किलो वजनाचे एकूण 36 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. उड्डाणानंतर काहीच वेळात हे सर्व उपग्रह आपल्या नियोजीत कक्षेत सोडण्यात आले. एलव्हीएम 3 – एम 2 असे या रॉकेटचे नाव असून त्या रॉकेटचे हे पहिलेच कमर्शियल उड्डाण होते त्यामुळे या मोहीमेला विशेष महत्व आहे.
पृथ्वीपासून 1200 किमी उंचीवरील अंतरीक्ष कक्षेत हे उपग्रह सोडण्यात आले आहेत. ब्रिटन मधील एका कंपनीशी केलेल्या करारानुसार हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले असून हे उपग्रह सरकार आणि अन्य व्यावसायिकांसाठी इंटरनेट सेवा देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.