तेल अविव, (इस्रायल) – इस्रायलकडून आता मध्य आणि दक्षिण गाझामध्येही जारदार हवाई हल्ले केले जाऊ लागल्यामुळे लेबेनानमधील इस्लामी कट्टरवादी गट हिज्बुल्लाहकडून इस्रालला प्रतिकार केला जाऊ लागला आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील रोश हनिकरा आणि किरयात श्मोना या शहरांवर जोरदार रॉकेट हल्ला केला.
दोन्ही शहरांवर मिळून १८ रॉकेट डागण्यात आली. यातील रोश हनिकरा शहरामध्ये इस्रायलचा नाविक तळ आहे. येथील रॉकेटचा मारा अधिक तीव्र होता. इस्रायलच्या उत्तरेकडील भागांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच प्रथमच अशा प्रकारचा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.
आज हिज्बुल्लाहने केलेल्या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिज्बुल्हाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून एकूण ३० रॉकेट डागल्याचे सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे इस्रायलनेही हिज्बुल्हाच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लेबेनानच्या दक्षिणेला इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान तिघेजण मारले गेले आहेत. ठार झालेल्यांमध्ये लेबेनान ऑस्ट्रेलिया वंशाचा एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि त्याच्या भावाचा समावेश आहे.
मूळ ऑस्ट्रेलिया वंशाचा हा व्यक्ती आणि त्याचा भाऊ हिज्बुल्लाहचे सदस्य होते, असा इस्रायलचा आरोप आहे. इब्राहिम बाजी आणि अली बाजी असे या दोघांची नावे आहेत. इब्राहिम हा अलिकडेच हिज्बुल्लाहकडून इस्रायलविरोधात युद्धात सहभागी होण्यासाठी सीडनीवरून लेबेनानला परत आला होता.
इस्रायलविरोधात ऑस्ट्रेलियातून लढवय्ये आले असल्याच्या इस्रायलच्या दाव्यावर ऑस्ट्रेलियाकडून ठोस प्रतिक्रीया दिली गेलेली नाही. हा दावा पडताळून बघण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. हिजबुल्ला, इराणचे समर्थन असेलेली आणि लेबेनानमधून कार्यरत असलेला अतिरेकी गट आहे. ऑस्ट्रेलियाने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.